हवामान विभागाने राज्यात 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.
राज्यात पुन्हा एकदा पावसाचं जोरदार आगमन होणार असून हवामान विभागाने 14 ऑक्टोबरपासून पुढील तीन दिवसांसाठी 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर केला आहे. विशेषतः दिवाळीपूर्वीच्या दिवसांत म्हणजेच 14, 15 आणि 16 ऑक्टोबरला राज्यातील काही भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
सोलापूर, सांगली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून कोल्हापूर, कोल्हापूरचा घाटभाग, सातारा आणि पुणे जिल्ह्यांमध्ये हलक्यांपासून मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. मात्र, अहिल्यानगरमध्ये हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे.
धाराशिव, लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर केला गेला आहे. तर जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांत यलो अलर्ट दिला आहे. या भागात विजांच्या गडगडाटासह आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबई शहर व उपनगरांमध्ये 14 ऑक्टोबर रोजी आकाश निरभ्र राहील, परंतु सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ होईल. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. कोकणात एकूण हवामान कोरडे राहील.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस 14 ते 16 ऑक्टोबरदरम्यान राज्यात सक्रिय राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पिकं आणि साठवणूक केलेल्या धान्यांची काळजीपूर्वक सुरक्षा करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.