मागील महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. पावसामुळे आलेल्या पुरामुळे राज्यातील 33 जिल्ह्यांतील 68 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या 48 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे.
याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई देणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. मात्र, आतापर्यंत केवळ बुलडाणा, हिंगोली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचेच अंतिम पंचनामे अहवाल सरकारला मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार नसल्याची स्थिती समोर आली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून तलाठी, मंडलाधिकारी पंचनामा अहवाल तहसीलदारांकडे पाठवत आहेत.
त्यानंतर तालुक्याच्या एकत्रित अहवालावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या सह्या झाल्यानंतर तो अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो. त्यांनी पीकनिहाय पडताळणी केली केल्यानंतर त्यात काही दुरुस्ती असल्यास तो अहवाल पुन्हा परत पाठवून दुरुस्त करून घेतला जात आहे.
दुरुस्तीनंतरचा अंतिम अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरीनंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्त, कृषी आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात शेवटच्या दहा दिवसांत बहुतेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणचे पंचनामे व अहवाल अंतिम व्हायला वेळ लागत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी एकही शेतकरी भरपाईरपासून वंचित राहणार नसल्याचं सांगितलं, ते म्हणाले, ‘प्राथमिक अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील 4 लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पंढरपूर व दक्षिण सोलापूर या 2 तालुक्यांचे पंचनामे अहवाल आमच्याकडे आलेत. उर्वरित तालुक्यांचे अहवाल दोन दिवसांत येतील. एकही बाधित शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.’