पूर्वी सोन्यातील गुंतवणूक म्हणजे सोन्याची दागदागिने, शिक्के वा सोन्याचा तुकडा खरेदी करणे असा अर्थ होता. पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे भौतिक सोने खरेदीची गरज नाही. आता सोन्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. डिजिटल गोल्ड, ईटीएफ, म्युच्युअल फंड वा सॉवरेन गोल्ड बाँड असे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. हा सर्व व्यवहार ऑनलाईन आणि पारदर्शक असल्याने युझर्सला त्यांच्या गुंतवणुकीची अपडेट केव्हा सुद्धा मिळवता येते. ही गुंतवणूक केव्हाही विक्री करता येते. धनत्रोयदशी आणि दिवाळी सारख्या सणाला अनेकजण दागदागिने खरेदी करण्याकडे वळतात. पण जास्त फायदा हवा असेल तर गुंतवणुकीचे हे पर्याय फायदेशीर ठरू शकतात.
डिजिटल गोल्ड हे बाजारातील सोन्याशी संबंधीत असते. बाजारातील किंमतीप्रमाणेच त्याचे भाव कमी जास्त होतात. येथे मेकिंग चार्ज वा स्टोरेज कॉस्ट लागत नाही. हे सोने 24×7 खरेदी-विक्री करता येते. केवळ 1 रुपयांपासून सुद्धा गुंतवणूक करता येते. वा एकरक्कमी गुंतवणूक करता येते. SIP च्या माध्यमातून ही गुंतवणूक करता येते. अनेक प्लॅटफॉर्म त्यासाठी उपलब्ध आहेत.
गोल्ड ETF
गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करता येते. हा एक्सचेंज-ट्रेडेड फंड असतो. हा फंड स्टॉक एक्सचेंजवर खरेदी आणि विक्री करता येतो. सोन्याच्या सध्याच्या किंमतीच्या जवळपास गोल्ड ईटीएफ खरेदी करता येते. गोल्ड ईटीएफचे बेंचमार्क स्पॉट भाव आहे. येथे गुंतवणुकीसाठी डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. गोल्ड ईटीएफने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे.
गोल्ड म्युच्युअल फंड
गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गोल्ड ETF सारखीच गुंतवणूक करता येते. या फंडमध्ये एकरक्कमी गुंतवणूक वा SIP अशा दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करता येते. हा गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय आहे. याचा खर्चाचा दर (Expense Ratio) गोल्ड ETF पेक्षा अधिक असतो. त्यामुळे ईटीएफ पेक्षा परतावा थोडा कमी मिळतो.
सॉवरेन गोल्ड बाँड
सॉवरेन गोल्ड बाँड हा सरकारने उपलब्ध करुन दिलेला पर्याय आहे. केंद्र सरकार वेळोवेळी असा पर्याय घेऊन येते. सार्वभौम सुवर्ण रोख्यावर दरवर्षी 2.50% निश्चित व्याज मिळते. गुंतवणुकीसाठी डी-मॅट खात्याची गरज आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोव्हेंबर, 2015 पहिल्यांदा गोल्ड बाँड आणले होते. तेव्हापासून 2021 पर्यंत एकूण 25,702 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोल्ड बॉण्डच्या विक्रीतून जमा करण्यात आली आहे. यामध्ये 8 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते. 5 वर्षानंतर ही रोखे मोडता येते. सध्या नवीन एसजीबीची घोषणा झालेली नाही.