अचानक वळण घेतलेल्या दुचाकीला अपघातापासून वाचविताना भरधाव चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. रस्त्याच्या दुसर्या बाजूला उभ्या असलेल्या पाच मोटारसायकलींवर रिक्षा आदळल्याने त्यात रिक्षासह दुचाकींचे नुकसान झाले.
अपघातात चालकासह तिघे जखमी झाले आहेत. सदर बाजार चौक ते भूविकास बँक या रस्त्यावर बुधवारी (दि. 15) सकाळी 10.15 च्या सुमारास ही घटना घडली.
चालक रमेश तहसीलदार (रा. गोळीबार मैदान) यांच्यासह आशिष हिंदुराव परीट (वय 45, रा. कसबा बावडा), बेबीताई दिनकर सातपुते (वय 65, रा. शिंदे गल्ली, कसबा बावडा) अशी जखमींचे नावे आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले.
तहसीलदार हे कसबा बावडा ते एस. टी. स्टँडदरम्यान प्रवासी वाहतूक करतात. बुधवारी सकाळी ते रिक्षातून प्रवाशांना घेऊन कसबा बावडा के. एस. टी. स्टँड मार्गावर जात होते. सदर बाजार चौकातून भूविकास बँक मार्गावर जात असताना पुढे असलेल्या दुचाकीस्वाराने अचानक वळण घेतले. दुचाकीला अपघातापासून वाचविताना भरधाव रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने काही अंतर पुढे जाऊन रिक्षा तेथे उभ्या असलेल्या दुचाकीवर उलटली. त्यात प्रवाशासह चालक जखमी झाला. या अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला. दरम्यान, नागरिकांनी उलटलेली रिक्षा उचलून रस्त्याकडेला लावली. 108 रुग्णवाहिकेला फोन करून घटनास्थळी बोलविले. जखमींना तत्काळ सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. अपघातात रिक्षासह पाच दुचाकींचे नुकसान झाले.