ऐन दिवाळीत कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि गायक ऋषभ टंडनचं दिल्लीत आज (बुधवार, 22 ऑक्टोबर) निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचं निधन झाल्याचं समजतंय. कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी तो दिल्लीला गेला होता. त्याच्या टीममधील माजी सदस्याने निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ऋषभच्या निधनाच्या वृत्ताने त्याच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. ऋषभ त्याच्या पत्नीसोबत मुंबईत राहत होता. परंतु दिवाळीनिमित्त तो कुटुंबीयांना भेटण्यासाठी दिल्लीला गेला होता.
ऋषभ उत्तम गायक, संगीतकार आणि अभिनेता होता. तो त्याच्या शांत स्वभावासाठी आणि संगीताबद्दल असलेल्या प्रेमासाठी ओळखला जायचा. 2008 मध्ये टी-सीरिजच्या ‘फिर से वही’ या म्युझिक अल्बमपासून त्याने करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने ‘फकीर- लिव्हिंग लिमिटलेस’ आणि ‘रशना- द रे ऑफ लाइट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ‘आशिकी’, ‘चांद दू’, ‘धू धू कर के’, ‘फकीर की जुबानी’ यांसारखी त्याची गाणी गाजली आहेत.
ऋषभला प्राण्यांविषयी प्रचंड प्रेम आणि आपुलकी होती. त्याच्या मुंबईतल्या घरात त्याने मांजरी, कुत्रे आणि पक्षी पाळले होते. ऋषभची काही गाणी प्रॉडक्शनच्या टप्प्यात असून येत्या काळात ती प्रदर्शित होणार होती. त्यावर तो काम करत होता. त्याच्या अचानक निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
ऋषभ त्याच्या करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चे होता. अभिनेत्री सारा खानसोबत त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या. या दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये साराच्या भांगेत सिंदूर होता. त्यावरून त्यांच्या लग्नाच्याही चर्चांना उधाण आलं होतं. परंतु काही काळानंतर साराने या चर्चा फेटाळल्या होत्या. ऋषभने नंतर रशियाच्या ओलेसिया नेडोबेगोवाशी (Olesya Nedobegova) लग्न केलं. उझबेकिस्तानमध्ये त्याच्या एका डिजिटल सीरिजसाठी ओलेसियाने लाइन प्रोड्युसरचं काम केलं होतं, अशी माहिती ऋषबने एका मुलाखतीत दिली होती. 2023 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. यावर्षी दोघांनी करवाचौथसुद्धा साजरा केला होता. त्याचे फोटो ऋषभने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले होते.






