जवाहरनगर परिसरातील फकीर मळा येथे व्यवसायातील इर्षेवरून शुक्रवारी सायंकाळी दोन गटात झालेल्या हाणामारीत एकजण गंभीर जखमी झाला.
अब्दुलरहमान मुस्तफा हाशमी (वय ४८, रा. फकीर मळा, जवाहरनगर) असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत दोन्ही बाजूंनी शिवाजीनगर पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून ६ जणांबर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रुवेज अब्दुलरहमान हाशमी (वय २१, रा. फकीर मळा, जवाहरनगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित आरोपी तौसिफ इनामदार (रा. इंदिरा कॉलनी, कबनूर) याने व्यवसायातील इर्षेचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या वडिलांवर म्हणजेच अब्दुलरहमान हाशमी यांच्यावर सत्तुरने वार केला.
मानेवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, तौसिफ अजीज इनामदार (वय ३७, रा. इंदिरा कॉलनी) यांनीही पोलिसात फिर्याद दिली आहे. एका हळदीच्या कार्यक्रमात फिर्यादी गेले असता त्यांना तू येथे का आलास असे म्हणत संशयितांनी एकत्र येऊन सत्तूर, दगड आणि खुर्थ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात त्यांना डोक्याला आणि शरीरावर गंभीर दुखापती झाल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी झाकीर हाशमी, रहेमान हाशमी, रियाज पठाण, आब्बु हाशमी आणि युनूस हाशमी (सर्व रा. शहापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दोन्ही गटातील व्यक्ती बॉयलर इन्सुलेशन कॉन्ट्रॅक्ट व्यवसायाशी संबंधित असून, व्यवसायातील मतभेदातूनच हा वाद निर्माण झाल्याचे पोलिस प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. हनिफा हाशमी यांच्या घरासमोर झालेल्या या हाणामारीमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरू आहे.
