Thursday, October 30, 2025
Homeकोल्हापूरदानवाड पुलाजवळ तरुणाची निर्घृण हत्या; ६ दिवसांत तिसरा खून, शिरोळ तालुका हादरला!

दानवाड पुलाजवळ तरुणाची निर्घृण हत्या; ६ दिवसांत तिसरा खून, शिरोळ तालुका हादरला!

दानवाड (ता. शिरोळ) आणि एकसंबा दरम्यानच्या दूधगंगा नदीवरील पुलालगत सोमवारी (दि.२७) सकाळी एका अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या करून मृतदेह टाकल्याची घटना उघडकीस आली. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सदलगा पोलिसांनी हा नियोजित खून असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

सकाळी पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना नदीपात्राच्या कडेलाच मृतदेह पडलेला दिसल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवकुमार बिरादार व कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी तपास करून पंचनामा करण्यात आला असून, हा खून नियोजित आणि जीवघेणा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून, मृत व्यक्तीच्या हातात चांदीचा कडा, अंगावर कॉलर नसलेला क्रीम रंगाचा टी-शर्ट, काळा स्पोर्ट्स जॅकेट, तसेच मेहंदी रंगाची नाईट पँट होती. त्याची उंची अंदाजे ५ फूट ९ इंच, रंग सावळा, आणि डोक्यावरील केस थोडे लांब आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.हे ठिकाण कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ असल्याने या घटनेचा तपास सदलगा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुरू आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

 

दरम्यान, शिरोळ तालुक्यात गेल्या सहा दिवसांत जयसिंगपूर परिसरात आणि कृष्णा नदीपात्राजवळ झालेल्या दोन खुनांच्या घटनांनंतर, या तिसऱ्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. हत्या महाराष्ट्रात झाली की कर्नाटकात? तसेच मृतदेह महाराष्ट्रातील व्यक्तीचा आहे की कर्नाटकातील? अशा अनेक बाजूंनी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

 

वरील वर्णनाशी जुळणाऱ्या कोणत्याही बेपत्ता व्यक्तीबद्दल माहिती असल्यास त्वरित सदलगा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सदलगा पोलिसांनी नागरिकांना केले आहे. तसेच कुरुंदवाड पोलिसांनीही कोल्हापूर जिल्हा व महाराष्ट्र राज्यातील या वर्णनाची व्यक्तीं बेपत्ता झाल्याची नोंद येते का? हे तपासण्यास सुरूवात केली आहे. या निर्घृण हत्येमुळे सीमाभागात खळबळ उडाली असून सदलगा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बिरादार यांनी चार पथके तयार करून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात रवाना केली असून सखोल तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -