अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोंथा चक्रीवादळाच्या अप्रत्यक्ष प्रभाव महाराष्ट्रावर पाहायला मिळत आहे. राज्यात पुढील ४८ तासात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढणार आहे. यामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच किनारपट्टीच्या भागांमध्ये समुद्र खवळलेला असल्याने खबरदारी म्हणून तीन नंबरचा लालबावटा फडकवण्यात आला आहे.
सध्या अरबी समुद्रातील स्थिती काय?
पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, जे हळूहळू किनारपट्टीकडे सरकत आहे. या प्रणालीमुळे समुद्रात उंच लाटा येण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान विभागाने तीन नंबरचा धोक्याचा इशारा असलेला लालबावटा जारी केला आहे. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव, सर्व मच्छीमारांनी आपल्या नौका किनारी लावून समुद्रात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही तासांमध्ये कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. ज्यात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमीपर्यंत राहू शकतो.
नैऋत्य बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. सध्या हे वादळ वायव्येकडे सरकत आहे. हे चक्रीवादळ मंगळवारी रात्री आंध्रप्रदेशातील काकीनाडा किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे. या दुहेरी हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
यामुळे दक्षिण कोकण गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी याठिकाणी समुद्र खवळलेला राहील. यामुळे अनेक भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. तर विदर्भ यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस अपेक्षित आहे.
मध्यम स्वरूपाचा पाऊस
मुंबई आणि ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी सागरी वाऱ्यांचा परिणाम कायम राहील. दिवसभर ढगाळ वातावरण आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मध्य महाराष्ट्र म्हणजे पुणे, नाशिक, अहिल्यानगर, नगर, सातारा, कोल्हापूर – घाटमाथा या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरुपातील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाडा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड येथे हलक्या सरींसह ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.






