आमराई रोड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार राहुल आवाडे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
आमराई रोड, महासत्ता चौक, निरामय हॉस्पिटल, गावभाग पोलीस स्टेशन (शांतीनगर), थोरात चौक ते स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या रस्त्याची विविध कामासाठी खुदाई करण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दूरवस्था झाल्याने या परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात तर वाहनधारकांनाच नव्हे तर पादचाऱ्यांना कसरत करावी लागत होती. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत होती.
या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या रस्ता कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता. त्याला यश आले असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकर या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनधारकातून समाधान व्यक्त होत आहे.






