गेल्या वर्षभरात सोने-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली. अत्यंत कमी कालावधीतच या मौल्यवान धातूंनी गुंतवणूकदारांना शेअर बाजारापेक्षाही जास्त परतावा दिला.
सणासुदीच्या काळात सोन्याच्या दराने सव्वा लाखांचा टप्पा ओलाडल्यानंतर अनेकांनी त्यातून नफाही कमावला. मात्र, आता परिस्थिती बदलत असून पिवळ्या धातूच्या किमतीत घट होताना दिसून येत आहे. दिवाळीआधी वाढलेले सोन्या-चांदीचे दर या आठवड्याच्या सुरुवातीलाच कमी झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करायची की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचाच हा आढावा…
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दराने सुमारे ४,३८१ डॉलर प्रति औंस इतका टप्पा गाठला होता; तर चांदीचे दर ५४.५ डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचले होते. मात्र, महिन्याअखेरीस या दोन्ही धातूंच्या किमतींत जवळपास १० टक्के इतकी घसरण झाली. मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर एका दिवसातच तब्बल सहा टक्क्यांनी खाली आला. गेल्या दशकभरातील एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण होती. याचा परिणाम भारतीय सराफा बाजारावरही दिसून आला.
अमेरिकेतही सोन्याच्या दरात घसरण
अमेरिकेतील सोन्याचा दर मंगळवारी २.४८ टक्क्यांनी घसरून ३,९१९.२१ डॉलर प्रति औंस इतका झाला आहे.
अमेरिकेत एका आठवड्यातच पिवळ्या धातूच्या किमतीत जवळपास सात टक्क्यांनी घसरण झाली आहे.
विशेष बाब म्हणजे, दिवाळीआधी १७ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भारतीय सराफा बाजारात २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रति तोळा एक लाख ३२ हजार २९४ वर पोहोचला होता.
गेल्या आठवड्यात सोन्याबरोबरच चांदीचे दरही झपाट्याने वाढले होते.
एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना तब्बल एक लाख ७०,४१५ रुपये मोजावे लागत होते.
या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात तब्बल आठ टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
२०११ नंतर पहिल्यांदाच इतकी घसरण झाल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सोने-चांदीचे दर कशामुळे कमी झाले?
तज्ज्ञांच्या मते, सोने-चांदीच्या दरातील या ऐतिहासिक घसरणीमागे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कारणे कारणीभूत आहेत. काही महिन्यांपूर्वी अमेरिका आणि चीन या दोन देशांमधील व्यापार संबंध ताणले गेले होते. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही सातत्याने दिसून येत होता, त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदी खरेदीला पसंती दिली. परिणामी काही दिवसातच मौल्यवान धातूचे दर झपाट्याने वाढले. ३० ऑक्टोबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दोन्ही देशांमधील व्यापार करारावर सहमती दर्शवली. या बातमीनंतर शेअर बाजारातील अनिश्चितता काहीशी कमी झाली आणि त्याचा सोन्याच्या दरांवर नकारात्मक परिणाम झाला.
गुंतवणूकदारांनी खरेदीकडे फिरवली पाठ
सोने-चांदी दरात विक्रमी वाढ झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी त्यातून नफा कमावण्याचा प्रयत्न सुरू केला.
अनेकांनी खरेदी ऐवजी विक्रीला प्राधान्य दिल्याने मौल्यवान धातूच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
परिणामी सलग दहा आठवड्यांनंतर पहिल्यांदाच सोन्याचे दर नकारात्मक पातळीवर बंद झाले.
विक्रमी किमतीवर नफावसुली, भारत आणि चीनसारख्या आशियाई बाजारपेठेतील कमी मागणी आणि अमेरिकन डॉलरमध्ये आलेली तेजी यामुळेच सोने-चांदीच्या दरावर परिणाम झाला, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
भारत-अमेरिका व्यापार संबंध हळूहळू सुधारत असल्याने गुंतवणूकदारांना विश्वास निर्माण झाला आहे, त्यामुळे सुरक्षित मालमत्ता सोडून ते जोखीम असलेल्या मालमत्तांकडे (शेअर बाजार) वळताना दिसून येत आहेत.
याच कारणामुळे सोन्या-चांदीच्या दरांत घसरण होताना पाहायला मिळत आहे.
सोन्याचे दर अजूनही विक्रमी पातळीवर
मौल्यवान धातूच्या किमतींत विक्रमी वाढ झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा कमावण्याच्या उद्देशाने त्याची विक्री सुरू केली आहे. परिणामी दोन दिवसांतच सोने-चांदीच्या दरात मोठी घट झाली. त्यातच सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांनी कमी खरेदी केल्याने किंवा त्याकडे पाठ फिरवल्यानेही आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे. सोन्या-चांदीच्या दरात तात्पुरती घसरण झाली असली तरी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात अधिक कपातीची अपेक्षा आणि जागतिक आर्थिक चिंता कायम आहे, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचे दर अजूनही खूपच जास्त असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का?
तज्ज्ञांच्या मते, सध्या सोने-चांदी दरात घसरण होत असली तरी हा त्यातील तेजीचा अंत नसून मोठ्या वाढीनंतर आलेला अल्पकालीन विराम आहे. या वर्षी जागतिक स्तरावरील संघर्ष आणि आर्थिक मंदीच्या भीतीमुळे, तसेच बँकांकडून होत असलेल्या मोठ्या खरेदीमुळे मौल्यवान धातूंच्या किमतींत तब्बल ६५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सध्या भू-राजकीय तणाव काहीसा कमी झाल्यामुळे आणि गुंतवणूकदार पुन्हा शेअर बाजाराकडे वळल्यामुळे सोन्याची ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून असलेली मागणी कमी झाली आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असली तरीही त्यात सध्या गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेची मोठी वित्तीय तूट, जगातील मध्यवर्ती बँकांचा अमेरिकन डॉलरपासून दूर जाण्याचा प्रयत्न आणि सततच्या भू-राजकीय तणावामुळे येत्या काळात मौल्यवान धातूंच्या किमतीत आणखीच वाढ होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.






