रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या एका चालत्या कारवर दगड पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ताम्हिणी घाटातील (Tamhini Ghat) कोंडीथर गावच्या हद्दीत गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. या भागातून एक कार जात असताना रस्त्यालगत असणाऱ्या डोंगरावरुन एक दगड घसरत खाली आला. हा दगड थेट कारवर आदळला. या दगडाचा वेग इतका होता की, कारचे छत (Car Sunroof) तोडून हा दगड आतमध्ये घुसला आणि आतमध्ये बसलेल्या महिलेच्या डोक्यात आदळला. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेची ओळख पटली असून तिचे नाव स्नेहल गुजराथी (वय 43) असे आहे. स्नेहल गुजराथी या पुण्यावरून माणगावच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी हा अपघात घडला.
आज सकाळी घडलेल्या या अपघातामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यावरुन माणगावच्या दिशेने एक गुजराती कुटुंब आपल्या अलिशान कारने प्रवास करत होते. या कारला सनरुफ होते. ताम्हिणी घाटातील कोंडीथर गावाजवळ एक दरडीचा भाग आहे. या दरडीतील दगड-गोटे खाली येऊन कारवर आदळले. यापैकी एक दगड सनरुफ तोडून वेगाने आत घुसला. हा दगड चालकाच्या बाजूला बसलेल्या स्नेहल गुजराथी यांच्या डोक्यात आदळला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यानंतर स्नेहल गुजराथी यांना उपचारासाठी मोदी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, क्लिनिकमध्ये नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ताम्हिणी घाटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे मुरुम असलेला दरडीचा भाग सैल झाला होता. त्यामुळे डोंगरावरील दगड-गोटे खाली आले.






