Thursday, October 30, 2025
Homeमहाराष्ट्रभात, उसाला अवकाळीचा सर्वाधिक फटका

भात, उसाला अवकाळीचा सर्वाधिक फटका

आठवडाभर सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ऊस, भुईमूग, सोयाबीन व भाताचे नुकसान झाले आहे. सुमारे 25 टक्क्यांच्या आसपास हे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सर्वाधिक फटका भाताला बसला असून, जिथे भात कापणी पूर्ण झाली आहे, तिथे 15 ते 20 टक्के तर ज्या ठिकाणी भात अजून रानात उभा आहे, तिथे 5 ते 10 टक्के नुकसान झाले असून, एकूण सुमारे 10 ते 15 हजार हेक्टरवरील क्षेत्राला दणका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

सरकारी पातळीवरून अद्याप याची पाहणी करण्यात आलेली नाही. पंचनामा करण्याचे काम सुरू असून, आठवडाभरात हे काम पूर्ण झाल्यानंतर नेमका नुकसानीचा अंदाज समजेल. मात्र, शेतकरी वर्गातून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत व नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

 

जिल्ह्याच्या विविध भागांत कोसळलेल्या कोसळधारांमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाला आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. यात भात पिकाला मोठा फटका बसला आहे. काढलेल्या भाताचे पावसाने नुकसान होणार आहे. तर शेतात उभे असलेल्या भाताला मोठ्या प्रमाणावर फटका बसला. सततच्या पावसामुळे भाताच्या ओल्या काड्या काळ्या पडू लागल्या आहेत. याशिवाय ढगाळ वातावरणामुळे शेतात आर्द्रता वाढली असून, पिकांची कापणी व वाहतूक यावर मोठा परिणाम झाला आहे. सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले असून, भुईमुगाला मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी भुईमूग काढला असून, उभ्या पिकाला आता कोंब येण्याची भीती आहे.

 

सहा महिने पाऊस; उसाचे पेरे 28 वरून 18 वर

 

साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होण्याच्या काळातच झालेल्या पावसामुळे उसाची तोड थांबली आहे. विशेषतः जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने उसाची वाढ खुंटली आहे. आता तोडीच्या वेळी उस साधारण 28 पेर्‍याचा व दोन ते अडीच किलो वजनाचा असतो. मात्र, पावसामुळे ही वाढ खुंटली असून, सध्या 16 ते 18 पेर्‍यांचा ऊस आहे व त्याचे वजनही दीड ते पावणेदोन किलोच्या आसपास आहे. यावरून उसाला बसलेला फटका लक्षात येतो.

 

महापुरानंतर पुन्हा अवकाळीचा फटका

 

ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यातील 32 हजार 500 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांना फटका बसला होता. यात भात, ऊस, सोयाबीन, भुईमूग सर्वाधिक बाधित होते. भाताचे सुमारे 11 हजार हेक्टर, सोयाबीनचे 8 हजार 500 हेक्टर, तर भुईमुगाचे चार हजार 200 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे कृषी विभागाने सांगितले होते. एकूण नुकसानाची किंमत 180 कोटींपेक्षा अधिक होती व 41 हजार शेतकरी प्रभावित झाले होते. पुन्हा आता अवकाळीने हातातोंडाला आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -