सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या मोंथा वादळामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या सागरात वादळ निर्माण झाल्याने लाटांचा जोर वाढला आहे. हीच बाब लक्षात घेता आता मच्छीमारांनी महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने गुजरात राज्यातील जाफराबाद येथून निघालेल्या अनेक मासेमारी बोटीने सध्या मीरा-भाईंदरचा उत्तन किनाऱ्यावर आश्रय घेतलेला आहे. तसेच वादळाचा धोका लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन आणि मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आगामी दोन दिवस महाराष्ट्रावर हे संकट कायम राहणार असून समुद्र खवळलेलाच असेल असे सांगण्यात आले आहे.
मेंथा वादळामुळे मासेमारी ठप्प
अरबी समुद्रात वादळ निर्माण झाल्याने किनारपट्टीवर पोलीस आणि समुद्र सुरक्षा दलाने गस्त वाढवली आहे. उत्तम परिसरातील रहिवाशांनी सांगितले की अचानक बाहेरील राज्यातील बोटिंची संख्या वाढल्याने किनाऱ्यावर हालचाल वाढली असून सर्व बोटी सुरक्षा ठिकाणी थांबवलेल्या आहेत. दुसरीकडे याच समुद्रातील वादळाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारीलाही बसला आहे. येथे सध्या मासेमारी ठप्प आहे. मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून समुद्रातील वातावरणामुळे मासेमारी व्यवसाय वारंवार ठप्प होत आहे. यामुळे मासळीची आवकही घटल्याने मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या वादळाच्या सावटाचा परिणाम खोल समुद्रातील मच्छीमारीवर झाला असून. शेकडोहून अधिक नौका देवगड बंदरात स्थिरावल्या आहेत.
5 नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहणार
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळाचा परिणाम मुंबईत दिसू लागला आहे. मुंबईत आज सकाळपासून पावसाची रिप रिप पाहायला मिळत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलामुळे राज्यात आणि मुंबईत पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने विदर्भ आणि कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील काही भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आधी कोकण किनारपट्टीवर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहणार असून हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो.
मेंथा वादळ मध्यप्रदेशच्या दिशेने सरकतेय
दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे हवामानात बदल झाल्याची माहीती मिळतेय. सध्या या वादळाचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले असून ते मध्यप्रदेशाच्या दिशेने सरकत आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार हे कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी विदर्भालगत पोहोचेल. तर शुक्रवारी ते पुढे युपी, बिहार आणि सिक्कीमच्या दिशेने सरकेल. त्यामुळे पुढील तीन दिवस या भागांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
