ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पहिला टी 20I सामना पावसामुळे पूर्ण झाला नाही. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसर्या टी 20I सामन्यात विजयी सलामी दिली आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना हा 4 विकेट्सने जिंकला. भारताने विजयासाठी दिलेलं 126 धावांचं आव्हान कांगारुंनी 13.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने यासह टीम इंडियाची मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमधील विजयी घोडदौड रोखली. टीम इंडियाने या मैदानात 17 वर्षांनंतर टी 20I सामना गमावला.
तिसऱ्या सामन्यासाठी संघात बदल
दुसरा सामना गमावल्यानंतर आता टीम इंडियासमोर तिसऱ्या टी 20I मध्ये विजय मिळवणं महत्त्वाचं झालं आहे. उभयसंघातील तिसरा सामना हा रविवारी 2 नोव्हेंबरला होबार्टमध्ये होणार आहे. त्याआधी यजमान ऑस्ट्रेलिया संघात बदल झाला आहे. हे बदल होणार असल्याचं या मालिकेआधीच ठरलं होतं.
जोश हेझलवूड 2 सामन्यांचा पाहुणा
जोश हेझलवूड याला पहिल्या 2 सामन्यांसाठीच संधी देण्यात आली होती. त्यामुळे जोश उर्वरित मालिकेचा भाग नसले. जोशने दुसऱ्या सामन्यात 3 विकेट्स मिळवल्या. जोशनंतर आता उर्वरित 3 सामन्यांसाठी माहली बिअर्डमॅन ऑस्ट्रेलिया संघासह जोडला जाणार आहे. तसेच सीन एबॉट याला पहिल्या 3 सामन्यांसाठी संधी देण्यात आली आहे. तर बेन द्वारशुईस याला शेवटच्या 2 अर्थात चौथ्या आणि पाचव्या टी 20I साठी संधी देण्यात आली आहे.
तिसऱ्या टी 20I सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रेव्हीस हेड, सीन एबॉट, झेव्हीयर बार्टलेट, महली बियर्डमॅन, टीम डेव्हीड, नॅथन एलिस, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मॅथ्यू कुहनेमॅन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोयनिस, जोश फिलिप (विकेटकीपर) एडम झॅम्पा आणि मिचेल ओवेन.
टीम इंडिया 2024 पासून अजिंक्य, ऑस्ट्रेलिया रोखण्यात यशस्वी ठरणार?
दरम्यान टीम इंडियाचा 2024 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेपासून दबदबा कायम आहे. भारताने या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर एकदाही टी 20i मालिका गमावलेली नाही. भारताने टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर एकूण 5 टी 20i मालिका खेळल्या आहेत. भारताने सर्व मालिका जिंकल्या आहेत. तसेच भारताने ऑस्ट्रेलियातही मालिका गमावलेली नाही. त्यामुळे कॅप्टन सुर्यकुमार यादव याच्यासमोर ही विजयी घोडदौड कायम राखण्याचं आव्हान असणार आहे.




