केंद्र सरकारने देशाच्या कोट्यवधी गरीब आणि कमजोर वर्गांसाठी मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (PMGKAY) पुढच्या पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिलेली आहे. आता या योजनेंतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना डिसेंबर 2028 पर्यंत मोफत अन्न मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश देशातील कोणताही गरीब उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली जाते.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना काय ?
ही केंद्र सरकारची सर्वात मोठी खाद्य सुरक्षा योजना आहे. ज्याची सुरुवात कोरोना साथीच्या वेळी मार्च 2020 रोजी झाली होती. याचा उद्देश्य लॉकडाऊन आणि आर्थिक संकटात गरीब आणि मजूरांना पुरेसे अन्न मिळावे यासाठी केली होती. सुरुवातीला काही महिन्यांसाठीच ही योजना राबवण्यात आली होती. नंतर याची गरज पाहून या योजनेला वेळोवेळी मुदतवाढ दिली आहे.
योजनेत काय लाभ मिळतात ?
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी केवळ मोफत अन्न नाही तर अनेक फायदेही मिळतात.
मोफत अन्न : या योजनेचा सर्वात मोठा आणि मु्ख्य लाभ आहे
प्रायोरिटी हाऊसहोल्ड (PHH) रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो धान्य ( गहू किंवा तांदुळ ) मोफत दिले जाते.
अंत्योदय अन्न योजना (AAY) अंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना प्रति कुटुंबांना 35 किलो अन्न दर महिन्याला मोफत दिले जाते.
ही मोफत अन्नधान्य योजना राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA)अंतर्गत मिळणाऱ्या सबसिडीवाल्या रेशनच्या अतिरिक्त नाही. त्याऐवजी आता NFSA अंतर्गत मिळणाऱ्या धान्यालाच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत पुढच्या पाच वर्षांसाठी संपूर्णपणे मोफत केलेले आहे.
आर्थिक मदत आणि अन्य लाभ ( जे या साथीदरम्यान पॅकेजचा भाग होते ) : जेव्हा 2020 या योजनेला एक मोठ्या पॅकेजच्या रुपात लाँच केले गेले होते,तेव्हा यात थेट कॅश ट्रान्सफर सारखे लाभ देखील सामील केले होते.
गरीब महिलांच्या जन-धन खात्यात थेट रोख रक्कम पाठवली होती. ज्येष्ठांना, विधवांना आणि दिव्यांगाना देखील अतिरिक्त आर्थिक मदत दिली होती.शेतकऱ्यांना पीएम-किसान योजनेंतर्गत आगाऊ हप्ता देण्यात आला होता आणि आणि मनरेगा कामगारांच्या वेतनात वाढ करण्यात आली.
या योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत येणाऱ्या सर्वांना लाभ देते. यामध्ये प्रामुख्याने हे घटक समाविष्ट आहे:
1) अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्रायोरिटी हाऊस होल्डचे (PHH) रेशन कार्डधारक
2) भूमिहीन शेतमजूर, सीमांत शेतकरी, ग्रामीण कारागीर (उदा. कुंभार, विणकर, लोहार).
3) शहरात राहणारे झोपडीधारक, रोजंदारीवर कामगार (उदा. कुली, रिक्षाचालक, कचरा वेचणारे).
4 ) सर्व पात्र बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) कुटुंबे.
या योजनेचा लाभ कसा उठवायचा ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक वैध रेशन कार्ड हवे. ‘वन नेशन, वन राशन कार्ड’ योजनेंतर्गत देशातील कोणत्याही सरकारी रेशन दुकानात मोफत धान्य घेऊ शकता. यासाठी दुकानात बायोमेट्रीक ओळख पटवावी लागते. सरकारच्या निर्णयाने पुढच्या पाच वर्षांसाठी गरीबांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न मिटला आहे.




