भरधाव ट्रॅक्टरची धडक बसून झालेल्या अपघातात पुलाची शिरोली येथील अनंत उर्फ बंटी नामदेव दरेकर वय वर्षे ४०, याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप येथे घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बंटी दरेकर हा टोप येथे बहिणीकडे गेला होता. सायंकाळी तो टोप येथील बाजार कट्ट्या समोर शिरोली गावी येण्यासाठी महामार्गालगत थांबला होता दरम्यान वाठार कडून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली ची त्यास जोराची धडक बसली. या धडकेत ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर ट्रॉलीसह येथून पळ काढला आहे.
या घटनेची माहिती शिरोलो एमआयडीसी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन दरेकर याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापुर येथे सिपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. दरेकर यांच्या पश्चात आई, पत्नी व तीन लहान मुले आहेत.



