राज्यातील अनेक भागात बिबट्यांनी शिकारीसाठी मानवी वस्तीत शिरकाव केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्याने मंचर येथे संतप्त नागरिकांना पुणे- नाशिक महामार्ग रोखून धरण्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. आता बिबट्यांचा वावर रात्री अपरात्री वाढल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत. चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे तर इगतपूरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला आहे. तर अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर आढल्याने या प्रकरणात वन विभागाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.
चिमूर तालुक्यातील शंकरपूर परिसरात काल दुपारी वाघाने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ईश्वर भरडे (वय 52) शंकरपूर-आंबोली रोडवरील ठाणा रिठ येथील आपल्या शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र संध्याकाळी होऊनही ते परत न आल्याने गावकऱ्यांनी वनविभागाच्या मदतीने त्यांचा शोध घेतला. त्यावेळी शेतातच छिन्नविच्छिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. शंकरपूर-भिसी रस्त्यावरील आंबोली गावाजवळ रस्त्याच्या मधोमध ट्रॅक्टरवर मृतदेह ठेवत गावकऱ्यांनी रात्री रास्ता रोको केला. अखेर प्रशासनाने मृताच्या वारसाला वनविभागात नौकरी आणि वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी चिमूर येथे शव विच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह नेला.
इगतपूरीत गावकरी जखमी
इगतपूरीत सर्वतीर्थ टाकेद येथे रात्रीच्यावेळी घरी जात असताना एकनाथ करंवदे यांच्यावर धानोशी शिवारात बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. करवंदे यांनी आरडाओरडा केल्याने या बिबट्याने धूम ठोकली. करवंदे यांच्यावर धामणगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



