Wednesday, November 12, 2025
Homeमहाराष्ट्र'या' विषयात २५ गुण मिळाले तरी दहावीचा विद्यार्थी उत्तीर्ण; गणित-विज्ञानला पाहिजे ७०...

‘या’ विषयात २५ गुण मिळाले तरी दहावीचा विद्यार्थी उत्तीर्ण; गणित-विज्ञानला पाहिजे ७० गुण; बारावीची १० फेब्रुवारी, दहावीची २० फेब्रुवारीपासून परीक्षा

इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा आता फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. परीक्षा जसजशी जवळ येईल तसे विद्यार्थ्यांची चिंता वाढते. पण, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र असल्याने सगळेजण सहज पास होऊ शकतात.

 

तर बारावीच्या विद्यार्थ्यांनाही उत्तीर्ण होणे फार कठीण नाही. त्यामुळे कोणीही ताण घेऊ नये, पालकांनीही विद्यार्थ्यांना जास्त ताण देऊ नये, असे आवाहन शाळांच्या मुख्याध्यापकांनी केले आहे.

 

बोर्डाच्या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी, प्रात्यक्षिक परीक्षा पार पडेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेत पास कसे होऊ, याची चिंता करू नये. परीक्षेत सीसीटीव्ही कॅमेरे असतील, परीक्षा अतिशय कडक होणार आहे, याची कोणीही चिंता करू नये.

 

अनेक विद्यार्थी परीक्षेच्या तणावातून चुकीचे पाऊल उचलतात, पण आता बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप आता बदलले असून विद्यार्थी सहजपणे उत्तीर्ण होईल, असे त्याचे स्वरूप आहे. परीक्षेपूर्वी विषयनिहाय अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून मोबाईलचा वापर कमी केल्यास निश्चितपणे चांगले गुण मिळतील, असा विश्वास मुख्याध्यापकांना आहे. पालकांनीही विद्यार्थ्यांना जास्त अभ्यासाचा ताण देऊ नये, त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण घेऊ नये

 

दहावी-बारावीच्या परीक्षेत आता प्रश्नपत्रिका नव्हे कृतिपत्रिका दिल्या जातात. त्यात प्रत्येक विषयाच्या प्रात्यक्षिकासाठी २० गुण, वस्तुनिष्ठ प्रश्न, उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे व निबंध असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांचा ताण घेऊ नये. अभ्यासाचे वेळापत्रक करावे, पूर्वीच्या परीक्षांमधील प्रश्नपत्रिकांचा सराव करावा, चांगले गुण मिळतील.

 

– तानाजी माने, राज्याध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ

 

दहावीचे विद्यार्थी सहज होतील उत्तीर्ण

 

इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी त्रिभाषा सूत्र अवलंबले आहे. त्यानुसार मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन विषयांत एकूण १०५ गुण आवश्यक आहेत. त्यातील एक-दोन विषयांना २५ जरी गुण मिळाले (तिन्ही पैकी एका विषयाला ६५ गुण) आणि तिन्ही विषयांचे एकूण गुण १०५ झाले, तरी तो विद्यार्थी पास होईल. दुसरीकडे गणित व विज्ञान या दोन विषयाचे एकूण गुण ७० असले तरी तो विद्यार्थी त्या विषयांत उत्तीर्ण होतो, असे उत्तीर्ण होण्याचे नवे सूत्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -