गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील पेट्रोल पंपचालक तसेच नामवंत व्यावसायिक बी. एन. पाटील यांच्या घरात शुक्रवारी सायंकाळी एका मोटारसायकलस्वाराने कुरिअर देण्याच्या बहाणा करून घरात प्रवेश केला.
यावेळी पाटील यांच्या पत्नीवर चाकूने हल्ला करत अंगावरील दागिने लुटून घरातील रोख रक्कम लंपास केली. भरदिवसा झालेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.
बी. एन. पाटील हे पत्नी अक्कमहादेवींसह गावाच्या मध्यभागी असलेल्या बंगल्यात राहतात. ते दररोज सायंकाळी गडहिंग्लज येथे असलेल्या पेट्रोल पंपावर जातात व पंपावरील कामकाज बघून मग घरी येतात. शुक्रवारीही ते सहाच्या सुमारास घरातून बाहेर पडले. त्यानंतर एक मोटारसायकलस्वार तोंडाला फडके बांधून त्यांच्या घरात आला. पाटील यांच्या पत्नीने दार उघडताच त्यांना चाकूचा धाक दाखवत अंगावरील दागिन्यांसह घरातील रोख रकमेची मागणी करू लागला.
चाकूचा धाक दाखवून घरातील कपाटातील साहित्य विस्कटत रोख रकमेचा शोध घेतला. त्यांना घरात आणखी पैसे कुठे आहेत, याबाबत वारंवार विचारणा करत त्यांच्या अंगावर चाकूने वार केला. यावेळी त्या जोरात ओरडल्या. त्यानंतर त्याने पळ काढला. त्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाल्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत श्वान पथक व ठसे पथकाला बोलावून शोध घेण्याचा प्रयत्न केला. उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले तसेच पोलिस निरीक्षक अजय सिंदरकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
चोरटा स्थानिक असण्याची शक्यता…
पाटील राहात असलेल्या परिसरात एक धार्मिक कार्यक्रम सुरू आहे. सायंकाळी बहुतांश लोक तिकडे कार्यक्रम असल्याने गेले होते. ते पेट्रोल पंपावर जात असल्याची वेळ तसेच कार्यक्रम या सगळ्याची माहिती घेऊन ही चोरी करण्याचा प्रयत्न केल्याने चोरटा स्थानिक असण्याची शक्यता आहे.



