साखरपुड्याचा आनंद काही क्षणातच शोकांतिका ठरला. सुरत येथे साखरपुडा आटोपून परतणाऱ्या कुटुंबाच्या कारला सोमवारी (दि. १०) मध्यरात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नवरदेवासह त्याची आई असे कुटुंबातील तिघे जागीच ठार झाले.
या अपघातात कारमधील दोन बालकांसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील सुरपान फाटा शिवारात (ता. साक्री) ही घटना घडली.
विजय रघुनाथ जाधव (वय २९ वर्षे) रा. हरीओम नगर, कासारे), त्यांची आई प्रमिला रघुनाथ जाधव (वय ६५ वर्षे) आणि प्रतिभा धनंजय पगारे (वय ३६ वर्षे) रा. उमराणे यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये कार्तिके धनंजय पगारे (वय ४ वर्षे), वलंब धनंजय पगारे (वय ३ वर्षे), भूषण कांतीलाल वाघ (वय ३८ वर्षे), महेंद्र जयंत जाधव (वय ३२वर्षे) व भूपेश कैलास शिंदे (वय २३वर्षे) सर्व रा. उमराणे) यांचा समावेश आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, कासारे गावातील विजय रघुनाथ जाधव यांचा साखरपुडा सुरत येथे पार पडला. साखरपुडा संपल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह कार (एमएच ०१ बीएफ ८८१४)ने परत येत होते. रात्री दीडच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरील दुभाजकावर आदळली. धडक एवढी जोरदार होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले; परंतु तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. जखमींना तात्काळ धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेनंतर साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. त्यांनी या महामार्गावरील धोकेदायक ठिकाणांचे तातडीने दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. तसेच रुग्णवाहिका व्यवस्थापनातील त्रुटींवर अधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली. स्थानिक ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सुरपान फाटा परिसरात वारंवार अपघात होत असल्याची तक्रार केली आहे.
रस्त्यावरील दुभाजक आणि वळणांवरील चुकीच्या बांधकामामुळे जीवघेणे अपघात वाढले असून प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. या भीषण अपघातानंतर कासारे आणि उमराणे परिसरात शोककळा पसरली आहे. नववधूसोबत संसाराची नवी सुरुवात करण्याच्या स्वप्नांनी निघालेला नवरदेव आणि त्याचे कुटुंब कायमचे काळाच्या पडद्याआड गेले अशा शब्दात ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



