कोल्हापुरातील गडहिंग्लजमधील भाजप महायुतीतून राष्ट्रवादीसोबत(Political) जाणार की जनता दलाची साथ देणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. असे असताना आता जनता दलासोबत भाजपने जाण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात जनता दल, जनसुराज्य व भाजप अशी आघाडी होणार आहे.गडहिंग्लज उपविभागात राजकीय समीकरणे बदलली असून, चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी मंत्री हसन मुश्रीफ, डॉ. नंदा बाभूळकर कुपेकर, राजेश पाटील, गोपाळराव पाटील यांच्या आघाडी विरोधात शिवाजी पाटील, भरमु अण्णा पाटील, विनायक तथा अपी पाटील अशी आघाडी रिंगणात उतरणार आहे. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन शाहू आघाडी स्थापन झाली. त्यास काँग्रेसने हात दिला असून, भाजपसमोर आव्हान उभे केले आहे.
गडहिंग्लज पालिकेसाठी जनता दल, भाजप, जनसुराज्य पक्ष एकत्रित येत राष्ट्रवादी काँग्रेस समोर आव्हान देण्यात आले आहे. काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भाजप विरोधात लढणार असल्याने आमदार शिवाजी पाटील यांनी मुश्रीफ यांच्या मतदारसंघात भाजपला त्याच्या विरोधात उभे केले आहे.कोल्हापूर येथे पालिका निवडणुकीसंदर्भात(Political) मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांनी तालुक्यात कुठं, कशी आघाडी करायची, याबाबत चर्चा केली होती. गडहिंग्लजमधूनही भाजपचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी गेले होते. गडहिंग्लज शहरामध्ये भाजप राष्ट्रवादीसोबत जाणार, अशी चर्चा सुरू होती. भाजपमध्ये आघाडीबाबत दोन मतप्रवाह होते.
जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी या बैठकीत सहभाग घेतल्यानंतर त्यांनी गडहिंग्लजमध्ये जनता दल जनसुराज्यसोबत भाजपने यावे, अशी चर्चा केली. यानंतर अंतिम निर्णय घेण्यात आला असून, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात जनता दल जनसुराज्य अशी आघाडी होणार आहे. गडहिंग्लज पालिकेच्या राजकारणात महायुती म्हणून एकत्र येऊन लढण्याबाबत चर्चा सुरू होती. महायुतीचा पक्ष म्हणून भाजप आपल्यासोबत येणार, असा मुश्रीफांचा अंदाज होता. मात्र, या घडामोडीतून भाजप मुश्रीफांच्या विरोधात लढणार, हे नक्की झाले आहे.




