राज्यात गारठा चांगला वाढला असून पारा घसरताना दिसतोय. उत्तर भारतातून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी पहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्ये उत्तर भारतामधील थंडी वाढण्याचा इशारा आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यामध्ये थंडीच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. राज्यातही थंडीच्या लाटेचा इशारा आहे. एकीकडे काही राज्यात गारठा वाढला आहे तर काही राज्यांमध्ये अजूनही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. देशात दोन वेगवेगळ्या परिस्थिती असून केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्रात पुढील काही दिवसांमध्ये थंडीची लाट येणार आहे.
काही ठिराणी पारा 10 अंशांच्या खाली घसरण्याची शक्यता राज्यात आहे. परभणी आणि जेऊरमध्ये 7 अंश तापमानाची नोंद झाली. जळगाव 7.1 अंश, निफाड 8.3, आहिल्यानगर 8.4 अंश सेल्सिएस तापमानाची नोंद झाली. पुणे, मालेगाव, महाबळेश्वर, गोदिंया, भंडारा, यवतमाळ, वाशिम या भागात पारा 10 अंशांच्या खाली गेला. दुसरीकडे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये आज आणि उद्या पावसाचा मोठा अलर्ट जारी करण्यात आला. राज्यात पुढील काही दिवसांमध्ये थंडीची तीव्र लाट येणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढलेला आहे. तापमानात अचानक घट झाल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. देवरी शहरासह परिसरात सकाळच्या सुमारास दाट धुक्याने अक्षरशः चादर पांघरली. रस्त्यावर काही मीटर अंतरावरही पुढील व्यक्ती किंवा वाहन स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे संपूर्ण परिसरात अंधारमय वातावरण निर्माण झाले होते.
देवरी नगरपंचायत मैदानात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना देखील धुक्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. पूर्ण मैदान दाट धुक्याने आच्छादित झाल्याने पायी चालणारे एकमेकांना ओळखूही शकत नव्हते. हवामानातील या अचानक बदलामुळे नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतला असून, तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवस अशाच प्रकारचे वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



