तारदाळ येथे बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्याने तिजोरीतील 5 लाख 76 हजार रुपयांचे सुमारे 9 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना सोमवारी 4.15 च्या सुमारास उघडकीस आली. याबाबत हरी मारुती चोपडे (वय 44, रा.निमशिरगाव रोड, ज्ञानेश्वरनगर तारदाळ) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चोपडे दाम्पत्य नोकरीसाठी नेहमीप्रमाणे बाहेर गेले होते, तर मुले शाळेत गेली होती. घर सांभाळणार्या मातोश्री सुशीला या दररोज घरी एकट्याच असतात. सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास सुशीला या घराला कुलूप लावून जवळच असणार्या पाहुण्यांच्या घरी गेल्या होत्या. 4.15 च्या सुमारास त्या घरी परत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. तिजोरीतील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यांनी मुलगा हरी याला याबाबतची माहिती दिली. शहापूरचे पो.नि. सचिन सूर्यवंशी, उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, गुन्हे प्रकटीकरणचे सहा. फौजदार अविनाश मुंगसे, अर्जुन फातले, शशिकांत ढोणे यांनी घटनास्थळी भेट दिली. उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनीही पाहणी करून तपासाबाबत सूचना दिल्या. ठसे तज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण केल्याचे तपास अधिकारी दरेकर यांनी सांगितले.






