देशभरात इंडिगोची विमाने रद्द होणे आणि विलंब होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे देशभरातील विमानतळांवर अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.
यादरम्यान ‘इंडिगो’ने शुक्रवारी त्यांच्या ग्राहकांची सार्वजनिक माफी मागितली आहे. विमान कंपनीने ‘आम्ही खरंच माफी मागतो, आणि आम्ही काळजी घेऊ’ असे शीर्षक असलेले एक सविस्तर निवेदन जारी केले आहे. या निवेदनामध्ये गेल्या काही दिवसांत प्रवाशांना सहन करावी लागलेली गैरसोय आणि मनस्ताप याची दखल घेण्यात आली आहे. तसेच सेवा पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
इंडिगोने म्हटले आहे की, सर्व प्रभावित झालेल्या प्रवाशांना त्यांनी मूळ पेमेंट केलेल्या पद्धतीनुसार आपोआप रिफंड दिला जाईल. तसेच ५ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत ज्या प्रवाशांनी तिकिट रद्द केले आहे किंवा आणि प्रवासाची वेळ बदलली आहे अशा प्रवाशांना त्यासाठीचे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले असल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे.
विमान कंपनीने नेमकं काय म्हटलं?
‘आम्ही मनापासून माफी मागतो आणि तुमच्यापैकी अनेकांसाठी गेले काही दिवस किती त्रासाचे असतील हे आम्ही समजू शकतो,’ असे विमान कंपनीने म्हटले आहे. तसेच या संकट रात्रीतून संपत नाही, पण तोपर्यंतच्या काळात इंडिगो तुमची मदत करण्यासाठी आणि आमची सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आमच्या क्षमतेनुसार सर्वकाही करेल, असेही विमान कंपनीने म्हटले आहे.
इंडिगोने आज सर्वाधिक विमान उड्डाणे रद्द केल्याची माहिती दिली. तसेच उद्यापासून प्रोग्रेसिव्ह सुधारणेसाठी आमचे सर्व सिस्टम रिबूट करणे आणि शेड्यूल करणे हे अत्यावश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे. विमानतळावरील गर्दी कमी करणे आणि सेवा स्थिर करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या आणि डीजीसीए यांच्या समन्वयातून शॉर्ट-टर्मसाठी विमान उड्डाणे रद्द केली जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
इंडिगोने प्रवाशांना त्यांचे विमान उड्डाण रद्द झाले असेल तर विमानतळावर येऊ नका असे आवाहन केले आहे. विमान कंपनीने कॉल सेंटर प्रतिक्षा कालावधी वाढल्याचे मान्य केले मात्र आपण तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी संपर्क केंद्रांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यांचे एआय असिस्टंट, 6Eskai हे देखील रिफंड, स्टेटस अपडेट्स आणि रिबुकिंग यासाठी वापरले जात असल्याचे विमान कंपनीने म्हटले आहे.
अनेक शहरांमध्ये हजारो हॉटेल रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. सरफेस ट्रान्सपोर्टची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वाट पाहत असलेल्या ग्राहकांना फूड आणि स्नॅक्स पुरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही विमान कंपनीने म्हटले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना लाउंज एक्सेस खुला करण्यात आल्याचेही विमान कंपनीने म्हटले आहे.
विमान कंपनीने म्हटले की, इंडिगोची विश्वसनीयतेसाठी प्रतिष्ठित असूनही अडथळ्यांमुळे हा ऑपरेशनल गोंधळ उडाला आहे. ‘तुमच्यापैकी अनेकांचा प्रवास हा रद्द झाला आहे आणि तुमच्यापैकी अनेक जण विमानतळावर दीर्घकाळासाठी अडकले होते आणि त्यांना माहिती मिळत नव्हती,’ असेही एअरलाईनने म्हटले.
सुधारणेची हमी देत इंडिगोने म्हटले की, ‘तुम्हाला मोठी सुधारणा दिसेल. तुमचा विश्वास आणि तुम्ही १९ वर्षांपासून आम्हाला दिलेले प्रेम परत मिळवण्यासाठी आम्ही सर्वोतपरी प्रयत्न करू ‘




