शहापूर पोलिस ठाण्याच्या आवारात मंगळवारी आरडाओरड, शिवीगाळ, मारहाण, पळापळ आणि पोलिसांची धरपकड, यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण बनले. सज्ञान मुला-मुलीने लग्न करून पोलिस ठाण्याच्या आवारात पाऊल टाकताच हाणामारीचा प्रकार घडल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील मुलाचे शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावातील मुलीच्या घरी जाणे-येणे होते. ओळखीतून त्यांचे प्रेमसंबंध जुळले. दोघेही सज्ञान असल्यामुळे त्यांनी घरातून पळून जाऊन लग्न केले. मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास दोघेही शहापूर पोलीस ठाण्याच्या आवारात आले. याची कुणकुण मुलीकडील नातेवाईकांना लागल्यामुळे मुलीकडील नातेवाईकांनीही धाव घेतली.
पोलीस ठाण्याच्या आवारात कोणाला काही समजायच्या आतच आरडाओरड, शिवीगाळ करीत नव वराला नातेवाईकांनी चांगलाच चोप दिला. यावेळी पोलिसांनी नववरासह मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान मुलीचे नातेवाईक मुलीला घेवून जात होते. मात्र पोलिसांनी त्यांना अडवून पोलीस ठाण्यात आणले. यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणाव होता. यावेळी उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, अविनाश मुंगसे, संतोष कांबळे, अभिजीत तेलंग, आरिफ वडगावे यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.





