महापालिका निवडणुकांचे निकाल आता जवळपास हाती आले आहेत. राज्यात भाजप आणि महायुतीला मोठं यश मिळालं आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सारख्या अनेक मोठ्या महापालिकांमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. अनेक महापालिकेत भाजपची सत्ता आली आहे, तर दुसरीकडे विरोधकांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान भाजपला महापालिका निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं, त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे, आणि एक प्रकारे सर्व रेकॉर्ड आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत. 29 पैकी 25 महापालिकेत भाजप किंवा महायुतीची सत्ता येत आहे. विषेत: सगळ्यांचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेतही जरी सध्या तिथे मतमोजणीला उशिरा होत असला तरी देखील सध्या जी वाटचाल सुरू आहे, त्यावरून निश्चितपणे त्या ठिकाणी पूर्णपणे बहुमत महायुतीला मिळणार आहे. मुंबईमध्ये देखील महायुतीला झेंडा फडकणार आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही, असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ते पुढे बोलताा म्हणाले की, आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेडा घेऊन गेलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे. तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो. या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे. ज्या पद्धतीने वेगवेगळ्या महापालिकेत आम्हाला यश मिळालं, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की लोकांना प्रामाणिकता हवी आहे, आणि म्हणून या ठिकाणी लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे, असं यावेळी फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.
मुंबईमध्ये भाजपला मोठं यश?
दरम्यान संपूर्ण राज्याचं लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाकडे लागलं होतं. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युतीला मोठं यश मिळालं आहे. मुंबईमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट 122 जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे 72 जागांवर आघाडीवर आहे.






