नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) खाजगी वाहनांसाठी FASTag घेताना अनिवार्य असलेली KYV प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होणाऱ्या या नियमानुसार, आता बँका थेट वाहन डेटाबेसद्वारे गाडीच्या नोंदणीची पडताळणी करतील.
टोल नाक्यावरील रांगा टाळण्यासाठी आणि प्रवास वेगवान करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या FASTag प्रणालीबाबत नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. जर तुम्ही नवीन फास्टॅग घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला ‘KYV’ (Know Your Vehicle) च्या झंझटीतून कायमची मुक्ती मिळणार आहे.
१ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, खाजगी वाहनधारकांसाठी (कार, जीप, व्हॅन) फास्टॅग जारी करताना अनिवार्य असलेली KYV प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. अनेकदा कागदपत्रे देऊनही तांत्रिक कारणांमुळे फास्टॅग सस्पेंड होण्याचे किंवा वारंवार व्हेरिफिकेशन मागण्याचे प्रकार घडत होते. आता या त्रासाला पूर्णविराम मिळणार आहे.
आतापर्यंत ग्राहकांना कागदपत्रे अपलोड करावी लागत होती, पण आता ही जबाबदारी बँकांवर असेल.
Vahan डेटाबेसचा वापर: बँका आता थेट सरकारी ‘वाहन’ (VAHAN) डेटाबेसद्वारे गाडीच्या नोंदणीची पडताळणी करतील.
कमी कागदपत्रे: ग्राहकांना वारंवार आरसी बुक किंवा फोटो देण्याची गरज उरणार नाही.
झटपट अॅक्टिव्हेशन: सर्व पडताळणी बँक स्तरावरच होणार असल्याने फास्टॅग लवकर सक्रिय होतील.
लक्षात ठेवा, KYV प्रक्रिया सामान्य प्रवाशांसाठी बंद झाली असली तरी, काही विशेष परिस्थितीत ती पुन्हा विचारली जाऊ शकते.
१. जर फास्टॅग चुकीच्या गाडीवर लावल्याचा संशय आला तर.
२. टॅगचा गैरवापर होत असल्यास.
३. टोल प्लाझावर काही तांत्रिक वाद निर्माण झाल्यास.
जुने यूझर्स: ज्यांच्याकडे आधीच फास्टॅग आहे, त्यांना घाबरण्याचे कारण नाही. जोपर्यंत तुमच्या टॅगमध्ये कोणतीही तांत्रिक समस्या येत नाही, तोपर्यंत तुम्हाला नवीन प्रक्रियेची गरज भासणार नाही.
कमर्शियल वाहने: हा दिलासा फक्त खाजगी गाड्यांसाठी आहे. बस, ट्रक आणि अवजड वाहनांसाठी मात्र KYV ची जुनी प्रक्रिया कायम राहणार आहे.
तुमचा फास्टॅग नेहमी योग्य मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी लिंक ठेवा, जेणेकरून बॅलन्स संपल्यामुळे डबल टोल भरण्याची वेळ येणार नाही.






