Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोण आहे हा कथित मामा ज्याने बाळूमामांच्या नावाने संपत्तीच्या राशी रचल्या!

कोण आहे हा कथित मामा ज्याने बाळूमामांच्या नावाने संपत्तीच्या राशी रचल्या!



धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन भोळ्याभाबड्या भक्तांचे शोषण करून त्यांना लुटण्याचा धंदा पश्चिम महाराष्ट्रात बेधडकपणे सुरू आहे. संत पुरुषांचा अवतार असल्याचे भासवून भूतबाधा काढणे, दुर्धर आजारापासून मुक्ती आणि अघोरी कृत्यांचा अवलंब करून भक्तांची पिळवणूक करणार्या कथित मामा याचा ‘उदो उदो’ केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या बहुचर्चित कथित मामासह त्याच्या चमत्काराचा ‘महिमा’ वाढविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्याच्या ‘लाभार्थी’ भक्तांकडून होत आहे.
मराठवाडा, विदर्भासह गोव्यातील काही लाभार्थ्यांकडून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यांसह कर्नाटकातील बेळगाव, हुबळी, धारवाड, शिमोगा, रायबाग, चिक्कोडी परिसरात कथित मामाचा जागर सुरू आहे. विशेषत: दुष्काळीपट्ट्यात भोंदूगिरीचे लोण अधिक व्यापक प्रमाणात फोफावत आहे. शेकडो भक्तगण जाळ्यात अलगद अडकत असून स्वत:ची आर्थिक फसवणूक करून घेत आहेत.

कर्नाटकात नाही चालली ‘लिंबूकला’
पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात कथिताची ‘लिंबूकला’ काही अंशी चालली असली, तरी कर्नाटकातील भाविकांनी मात्र त्याच्या उचापतीला थारा दिला नसल्याचे चित्र आहे.
संत पुरुषांचा अवतार आहोत, असे सांगत स्वत:ची तुंबडी भरणार्या कथित मामाचे उपद्व्याप आदमापूर ग्रामस्थांच्या कानावर आल्यानंतर सगळे गाव त्याच्या विरोधात एकवटले आहे.


कर्नाटकातील भाविकांनी मात्र पाच-सहा वर्षांपूर्वीच ढोंगी मामाला सीमाभागातूनच परतवून लावला होता. त्याचवेळी ग्रामस्थांकडून त्याचा बंदोबस्त झाला असता, तर कथित मामाचे स्तोम इतके माजले नसते.

भोंदूगिरीची पिलावळ!
संत बाळूमामांवर अपार श्रद्धा असणार्या भक्तांची संख्या कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकसह गोव्यापुरती मर्यादित नाही. मराठवाडा, विदर्भ, कोकणसह अन्य राज्यांत अनेक मंदिरांत भाविकांनी बाळूमामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. तेथेही सकाळ-सायंकाळ पूजा-अर्चेसह अमावास्येला महाप्रसादाचे आयोजन होते. अखंड पारायण सोहळे चालतात. या प्रभावाचा गैरफायदा घेत काही ठिकाणी भोंदूगिरीची पिलावळ उदयाला आली आहे.


कथित मामा बनलाय बेनामी संपत्तीचा मालक!
बाळूमामांच्या आयुष्यात त्यांनी सांभाळलेली बकरी हीच त्यांची श्रीमंती आणि भक्तांचा गोतावळा हेच त्यांचे गणगोत. ‘जमेल तोवर बकरी सांभाळा… ज्या दिवशी जमणार नाही, त्या दिवशी आदमापूरच्या डोंगरात सोडून द्या…’ असा संदेश देणार्या बाळूमामांच्या नावाचा फायदा घेत कथित मामाने बेनामी संपत्तीच्या राशी रचल्या आहेत. पत्नीच्या नावे 27 एकर जमीन खरेदी केली आहे. स्वत:सह आई, मुलाच्या नावेही स्थावर मालमत्ता केली आहे. स्वत:सह पत्नीच्या नावे कंपन्या स्थापन करून भाविकांकडून आलेल्या देणग्या त्यात गुंतविल्या आहेत.

दौंड, सावंतवाडीला मठ, बारामतीला फ्लॅट, पंढरपूर, शिर्डीतही गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. खुद्द मावसभावानेच कथित मामांच्या बेनामी मालमत्तेसह त्याच्या कारनाम्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
कथित मामा अन् गोरगरिबांवर बंदुकीचा धाक!
कथित मामांच्या दर्शनासाठी म्हणे, राज्यातीलच काय, पण अन्य राज्यांतूनही भाविकांची प्रत्येक अमावास्येला हजेरी लागते. आलिशान मोटारीतून येणार्या भाविकांना गोरगरीब शेतकर्यांच्या मालमत्तेचे, शेतातील पिकांचे भान नसते. उभ्या पिकातून आलिशान मोटारी भरधावपणे शेतातून जातात.
कष्टाने फुलविलेल्या बागा एका क्षणार्धात नष्ट होतात; पण त्याची मामाला फिकीर नसते. ग्रामस्थांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला की, कथित मामा आणि त्याचे साथीदार अरेरावीची भाषा करतात. बंदूक घेऊन अंगावर धावून जातात. हा अन्याय सोलापूर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आणि पोलिस यंत्रणांच्या नजरेला येत नाही का? की डोळ्याला झापड आली असावी असेच समजायचे, असा गोरगरीब शेतकर्यांसह ग्रामस्थांचा सवाल आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -