Monday, May 27, 2024
Homenewsअर्थव्यवस्था पुन्हा गतिमान; वाहन खरेदीत वाढ

अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान; वाहन खरेदीत वाढ


कोरोनाचा काहीही परिणाम न होता भारतीय अर्थव्यवस्था वादळवेगाने पुढे चालली आहे. निर्देशांक व निफ्टी रोजवरच्या पातळ्या ओलांडत आहेत. गुरुवारी शेअर बाजार बंद होताना निर्देशांक व निफ्टी अनुक्रमे 57,852 व 17,234 वर स्थिर झाले. दिवाळीपर्यंत निर्देशांक 60 हजारांवर जावा व निफ्टी 18,300 पर्यंत जावा.


2021-2022 च्या जून अखेरच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था 20 टक्क्यांनी वाढली होती. अर्थव्यवस्था वाढीच्याबाबत आपण चीनच्या पुढे असून, अमेरिकेसह सर्व विकसित राष्ट्रेही आपल्या मागे आहेत. कोरोनाचा तडाखा जोरदार असूनही अर्थव्यवस्थेने 20 टक्क्यांची झेप घेतली आहे.
एसबीआय म्युच्युअल फंडाने 12 ऑगस्ट ते 25 ऑगस्टच्या दरम्यान 14000 हजार कोटी रुपये निवेशकांकडून गोळा केले. आतापर्यंत गोळा केलेल्या रकमेच्या हा सर्वात मोठा आकडा आहे. ‘एसबीआय’ म्युच्युअल फंड ही देशातील सर्वाधिक मोठी कंपनी आहे. कंपनीची एकूण जिंदगी 5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. फंडाच्या ‘बॅल अॅडव्हान्टेज फंड’ या एनएफओ (न्यू फंड ऑफर)साठी 3 लाखांहून अधिक अर्ज आले होते.

लोकांनी क्रेडिट कार्डाद्वारे केलेल्या खर्चात वाढ होत आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार के्रडिट कार्डाद्वारे जेवढा खर्च होत आहे, तेवढा खर्च कोरोनाच्या लाटेपूर्वी व लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी नव्हता. यंदा जूनमध्ये क्रेडिट कार्डाद्वारे 62 हजार 746 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली. जुलै 2021 ते 22 च्या दुसर्या तिमाहीत क्रेडिट कार्डाद्वारे होणारा खर्च 35 टक्क्यांहून अधिक असेल.
पुढील सहामाहीत अशोका बिल्डकॉम हा शेअर वर जाण्याची अपेक्षा आहे. या कंपनीच्या शेअरचा सध्याचा भाव 100 रुपये आहे. तो 153 रुपये व्हावा.
कोरोना काळात घरून काम करत असूनही ग्राहकांनी नव्या वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केल्याचे दिसून आले आहे. ऑगस्ट महिन्याची आकडेवारी बुधवारी 1 सप्टेंबरला प्रसिद्ध झाली असून, त्यानुसार देशांतर्गत बाजारपेठेत वाहन विक्रीत 5 टक्के ते 50 टक्के वाढ दिसून आली आहे.
तरीही सुट्या भागांची टंचाई, सेमी कंडक्टरसारख्या इलेक्टॉनिक भागांची कमतरता, ही दोन आव्हाने वाहन कंपन्यांसमोर अजून काही काळ रहाणार आहेत. ‘टोयाटो किर्लोस्कर मोटार’च्या वाहन विक्रीत ऑगस्टमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या (2020 ऑगस्ट) तुलनेत यंदा 12,772 कारची विक्री कंपनीने केली आहे.

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती ‘सुझुकी इंडिया’च्या गाड्यांच्या विक्रीत 5 टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात कंपनीच्या 1,30,699 गाड्या विकल्या गेल्या. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये कंपनीने 1,24,624 गाड्यांची विक्री केली होती.
‘महिंद्रा अँड महिंद्रा’ ने ऑगस्ट 2021 मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत 17 टक्के वाढ नोंदवली. एकूण 15,973 प्रवासी वाहनांची विक्री केली. ऑगस्ट 2020 च्या 13,651 प्रवासी वाहनांची विक्रीच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. याच महिन्यात यंदा कंपनीने 11,432 व्यावसायिक वाहनांची विक्री भारतात केली. वाहनांच्या निर्यातीतही कंपनीने चांगल्या प्रकारे वाढ केली आणि 3180 वाहने निर्यात केली.
बजाज ऑटोने ऑगस्ट 2021 मध्ये 3,73,270 वाहनांची विक्री केली. मागच्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये कंपनीने 3,56,199 गाड्या विकल्या होत्या. वैयक्तिक कंपन्यांच्या गाड्यांच्या विक्रीप्रमाणे जरी वाढ दिसत असली तरी, देशातील मध्यमवर्गीयांची वाढती संख्या बघता मोटार व्यवसायाला पुढील अनेक वर्षे चांगलीच राहणार आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये टाटा मोटर्सच्या गाड्यांच्या विक्रीत 53 टक्के इतकी घसघसीत वाढ दिसते. ऑगस्टमध्ये कंपनीने 54,190 गाड्यांची विक्री केली. प्रवासी वाहनांच्या विक्रीत 51 टक्के वाढ होऊन 28,018 गाड्या विकल्या गेल्या आहेत. याच महिन्यात पॅसेंजर गाड्यांव्यतिरिक्त 29,781 व्यावसायिक वाहनांची विक्री झाली. ही विक्री 2020 ऑगस्टपेक्षा 66 टक्के जास्त आहे.

वस्तू सेवा कराचे केंद्र सरकारला मिळणारे उत्पन्न 1 लाख 12 हजार कोटी रुपयांवर गेले आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात वस्तू सेवा कराला नेहमीच जास्त महत्त्व असते. ही वाढ लक्षात घेता, पुढील अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांना सध्याच्या 5 प्रकारच्या दरात बदल करण्याची संधी आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे यंदा जूनमध्ये हे उत्पन्न 1 लाख कोटी रुपयांच्या आत जरी पसरले होते; पुढील 2 महिन्यांत कोरोनाची लाट ओसरल्यामुळे आणि लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जात असल्यामुळे हे उत्पन्न पुढे वाढू लागले आहे. बोगस जीएसटी बिले दाखवणार्यांवर कडक कारवाई होत असल्यामुळेही वस्तू सेवा कराचे उत्पन्न वाढतच राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -