Saturday, July 27, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीतील गुंडाचा मिरजेत खून

इचलकरंजीतील गुंडाचा मिरजेत खून

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शहरातील प्रताप कॉलनीत गोळ्या, शेंगदाणे पॅकींग व्यवसायातून शिल्लक राहिलेल्या पैशातून वादावादी झाल्याने इचलकरंजी येथील सराईत गुन्हेगार योगेश हणमंत शिंदे (वय 28, मूळ इचलकरंजी, सध्या रा. मिरज) याचा दोघांनी लोखंडी सळीने गळ्यावर हल्ला करून तसेच गळा दाबून खून ( murder ) केला. ही घटना सोमवारी रात्री (दि. ३) घडली.

याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी काही तासातच सलीम ग्यासुद्दीन सय्यद (रा. उत्तमनगर, मिरज) आणि प्रकाश अनिल पवार (रा. प्रताप कॉलनी, मिरज) दोघांना अटक केली. न्यायालयाने दोघांची एक दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

योगेश शिंदे हा इचलकरंजी येथील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर इचलकरंजीमध्ये अनेक गुन्हे दाखल असून तो कळंबा कारागृहात होता. कारागृहातून पॅरोलवर सुटल्यानंतर तो फरारी झाला होता. त्यानंतर तो मिरजेत प्रताप कॉलनीमधील एका खोलीत पत्नीसह राहत होता. दरम्यान एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करीत होता. ( murder )

तर रेल्वेत भेळ विकणारा सलीम सय्यद आणि गोळ्या, शेंगदाणे विकणारा प्रकाश पवार हे दोघे योगेश याच्या शेजारी राहण्यास होते. त्यामुळे त्यांच्यासोबत त्याची दरम्यानच्या काळात ओळख झाली होती या ओळखीतून तो हॉटेलमधील वेटरचे काम झाल्यानंतर प्रकाश याला रेल्वेत गोळ्या, शेंगदाणे विक्री करण्यासाठी पॅकींचे काम करून देत होता. योगेश हा अनेक वेळा त्यांच्यासोबत रेल्वेत गोळ्या, शेंगदाणे विक्रीसाठी देखील जात होता.

तिघे मित्र असल्याने दररोज ते दारू पिण्यासाठी एकत्र बसत होते. परंतु गोळ्या पॅकींग करण्याच्या व्यवहारात तिघांमध्ये काही वेळा वादावादीच्या घटना घडल्या होत्या. यातून एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. सोमवारी रात्री देखील तिघांनी एकत्र बसून दारू घेतली. त्यानंतर ते प्रताप कॉलनी येथील घरी परतले. योगेश हा राहत असलेल्या घराच्या कट्टयावर बसला असता त्यांच्यात गोळ्या पॅकींगच्या व्यवहारात शिल्लक राहिलेल्या दोनशे रुपयांतून पुन्हा वादावादी झाली.

वादावादीचे पर्यावसन मारामारीत झाले. त्यामुळे दोघांनी सोबत आणलेल्या सळीने योगेश याच्या गळ्यावर हल्ला केला. अचानक हल्ला झाल्याने योगेश जमीनवर कोसळला. त्यानंतर दोघांनी सळीने योगेश याचा गळा दाबला. यामुळे गुदमरुन योगेश याचा जागीच मृत्यू झाला. योगेश याचा आरडाओरडा ऐकून त्याची पत्नी संगीता ही घराबाहेर आली. योगेश याला जमिनीवर कोसळल्याचे पाहून संगीता यांनी आरडाओरडा करताच दोघांनी घटनास्थळावरून पलायन केले.


RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -