ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली, तरी तूर्तास लॉकडाऊन लावला जाणार नाही. कोरोना रुग्णवाढीचा दर पाहता नवे कडक निर्बंध लावले जातील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. आरोग्य विभाग व टास्क फोर्सच्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. एक-दोन दिवसांत नव्या निर्बंधांची नियमावली जाहीर होईल, असेही टोपे यांनी सांगितले.
राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ओमायक्रॉनवरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात बुधवारी सकाळी बैठक झाली. यावेळी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव, टास्क फोर्सचे सदस्य आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे यांनी सांगितले की, लॉकडाऊन लावला, तर पुन्हा राज्याच्या अर्थचक्रावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे तूर्तास तरी लॉकडाऊन नकोच, अशा निष्कर्षाप्रत राज्य सरकार आले आहे. आजच्या बैठकीतही त्या मुद्द्यावर एकमत झाले. विषाणूवर नियंत्रण मिळवायचे असेल, तर कोणत्याही परिस्थितीत गर्दी थांबवणे गरजेचे आहे, असे मत प्रशासन व टास्क फोर्सने व्यक्त केल्याचे टोपे यांनी सांगितले. मंत्रालयातल्या या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. याबाबत ते अधिक माहिती घेतील आणि एक-दोन दिवसांत नव्या निर्बंधांबाबतची नियमावली जारी केली जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊन शब्द नकोच
यापुढे लॉकडाऊन हा शब्दप्रयोग करायचाच नाही. कारण, सर्व काही 100 टक्के बंद करण्याची गरजच भासणार नाही, असा मतप्रवाह बैठकीत व्यक्त झाला.
अनावश्यक सेवा मुंबईत बंद होणार
खासकरून मुंबईसारख्या शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवून बिगर अत्यावश्यक सेवा थांबवण्याचा विचार सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे राज्याचे लक्ष आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई, ठाण्यासाठी निर्बंधांचा वेगळा निर्णय घ्यावा लागेल.
आरोग्यमंत्री राजेश टोपे : लॉकडाऊन नाही; तूर्त कठोर निर्बंध
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -