पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावजन्य परिस्थितीचा थेट परिणाम भारतावर जाणवू लागला आहे.या पार्श्वभूमीवर तेल, पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरचा वापर जपून करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला आता महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. इंधन बचतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ मोठे निर्णय घेतले आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्री-अधिकाऱ्यांसाठी महत्वाचे आदेश काढले आहेत.
इंधन बचतीच्या अनुषंगाने आज बुधवारी पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात केवळ दोन कारचा समावेश दिसून आला. त्यानंतर आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आली आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात केवळ ८ गाड्या दिसून आल्या. तर अनेक मंत्री ताफ्यात इलेक्ट्रिक कारचा समावेश करताना दिसत आहे.
मुख्यमंत्र्यांनी किती निर्णय घेतले?
इंधन आणि परकीय चलन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी 2 उच्चस्तरीय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ६ निर्णय घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तात्काळ प्रभावाने अर्ध्यावर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांची असेल, असेही नमूद करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतले?
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार, मंत्री-अधिकाऱ्यांना कोणतेही विदेश दौरे करु नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. आता मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करु नये. त्याऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करावा. मंत्री-अधिकाऱ्यांनी आवर्जून मेट्रो आदी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा.
पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस असा प्रयोग करावा. अधिकाऱ्यांना बैठकांना बोलावण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात. सरकारकडून वितरित करण्यात आलेल्या वाहनांचा काटेकोरपणे आढावा घेण्यात यावा. ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्जवरील कारवाया वाढवण्यात याव्यात आणि तेथे डेकोरेटिव्ह लायटिंगचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.
पुण्यात ‘व्हीआयपी कल्चर’ला लागणार ब्रेक
अखेर पुण्यात ‘व्हीआयपी कल्चर’ला ब्रेक लागणार आहे. पुण्यातील महत्वाच्या आणि अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा 50 टक्क्यांवर आली आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. आजपासूनच निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शकानुसार पोलिसांनी निर्देश दिलेत.त्यामुळे कॅबिनेट मंत्री, राज्य मंत्री खासदार यांच्या ताफ्यातील गाड्या सुद्धा कमी होणार आहेत.




