ठाणे रेल्वे स्थानकाजवळील अत्यंत गजबजलेल्या गावदेवी भाजी मार्केट परिसराला आज (२१ मे) पहाटे भीषण आग लागली. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत मार्केटमधील अनेक दुकाने आणि गोडाऊन जळून खाक झाले. ही आग विझवताना धुरामुळे गुदमरून आणि होरपळून दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमी झालेल्यांमध्ये महापालिकेचे एक अग्निशमन जवान आणि रात्रपाळीवर असणारे एक सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे.
कापड, प्लास्टिकमुळे आग भडकली
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमी गजबजलेले असणारे गावदेवी भाजी मार्केट पहाटेच्या वेळी शांत होते. मात्र, पहाटे ४ च्या सुमारास अचानक मार्केटमधून धुराचे लोट निघू लागले. त्यानंतर पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. या मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर कपड्यांची दुकाने आणि विविध साहित्याची गोडाऊन आहेत. कापड, प्लास्टिक आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्यामुळे आग अतिशय वेगाने पसरली. अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
या आगीची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान ५ अग्निशमन गाड्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मार्केटमधील अरुंद गल्ल्या आणि धुराचे प्रचंड साम्राज्य यामुळे सुरुवातीला आग विझवण्यात मोठे अडथळे येत होते. तरीही जवानांनी जीवाची बाजी लावून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
आग विझवण्याच्या मोहिमेदरम्यान कर्तव्यावर असलेले अग्निशमन जवान आणि रात्रपाळीवर असणारे महानगरपालिकेचे सुरक्षारक्षक आगीच्या कचाट्यात सापडले. यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटेची वेळ असल्यामुळे मार्केटमध्ये लोकांची गर्दी नव्हती, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी जीवितहानी टळली.
व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान, कारण अस्पष्ट
या भीषण आगीत कपड्यांची दुकाने आणि गोडाऊन जळाल्यामुळे व्यापाऱ्यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन भाजी मार्केटमध्ये लागलेल्या या आगीमुळे परिसरातील वाहतुकीवर आणि सकाळच्या बाजारपेठेवर काही काळ मोठा परिणाम झाला होता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


