राज्यात मान्सूनच आगमन झालं आहे. मात्र मान्सूने अजूनही पाहिजे तेवढा जोर पकडलेला नाहीये. मान्सून अद्यापही तळकोकणातच रेंगाळला असून, मान्सूनची वाटचाल मंदावली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही मान्सूनच्या पहिल्या पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊसच न झाल्यामुळे पेरण्या रखडल्या असून, शेतकऱ्यांच्या मनावर चिंतेचे ढग दाटून आले आहेत. सर्वांचेच डोळे पावसाकडे लागले आहेत. त्यात भरीस भर म्हणजे भारतीय हवामान विभागाकडून (IMD) यंदा पावसावर अल निनोचं सावट असेल असा इशारा देण्यात आला आहे. अल् निनोमुळे सरासरी पावसाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान त्यातच आता एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे हवामान विभागाकडून राज्यात 20 जूननंतर चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार पावसाची प्रतीक्षा अजून वाढली आहे.
कोकणातील काही जिल्हे सोडता अद्यापही राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालेलाच नाहीये. मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भाला अजूनही पावसाची वाटच पहावी लागणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. विदर्भात मान्सूनची प्रतीक्षा कायम असून, आता ही प्रतीक्षा आणखी 3 ते 5 दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज नागपूर हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मान्सून अजूनही तळ कोकणात रेंगाळला होता, पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती नव्हती. मात्र आता हळुहळु परिस्थितीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भात 25 जुलै नंतरच मान्सूनचे आगमन होईल अशी शक्यता आहे. मात्र येणारे काही दिवस तापमानाचे राहणार असून तापमान सामान्य पेक्षा जास्त राहील, असा अंदाज नागपूर हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी वर्तवला आहे. दरम्यान उर्वरीत महाराष्ट्रात देखील येत्या 22 जूननंतरच पावसाला सुरुवात होईल, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.
जय पवार यांची प्रादेशिक हवामान केंद्राला भेट
दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि त्याचा राज्यावर होणारा संभाव्य परिणाम जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्रला नुकतीच भेट दिली. यावेळी हवामान खात्याचे तज्ज्ञ बिक्रम सिंग यांनी त्यांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा दिला.
या चर्चेदरम्यान पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबामागील विविध कारणांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. यामध्ये एल निनो (El Niño) चा संभाव्य प्रभाव तसेच इतर महत्त्वाच्या हवामानविषयक घटकांवर चर्चा झाली. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 25 जूनच्या आसपास पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. राज्यात पाऊस पूर्णपणे सक्रिय होऊन समाधानकारक आणि सातत्यपूर्ण सुरू होईपर्यंत पेरणीसाठी घाई करू नका. घाईघाईने पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊन, आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे हवामान खात्याच्या सूचनांचा विचार करूनच पुढील निर्णय घ्यावा असं आवाहान यावेळी जय पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केलं आहे.





