आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वारीसाठी प्रवास करणाऱ्या वाहनांना पथ करातून पूर्ण सूट देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, (Warkari) त्यासाठी विशेष पास आणि स्टिकर्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच वाहतूक, सुरक्षा आणि रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतही विविध यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.
वारीसाठी वाहनांना टोलमाफी, पास कुठे मिळणार आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या 10 मानाच्या पालख्या तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणारी वाहने, वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारितील टोल नाक्यांवर पथकर माफ करण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केले आहे.
सन 2026 च्या आषाढी वारीच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भाविकांच्या सुविधा, वारी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहनांना टोलमाफी देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांसाठी “आषाढी एकादशी 2026”, वाहन क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद असलेले स्टिकर्स किंवा पास परिवहन विभाग , वाहतूक पोलीस, संबंधित आरटीओ (RTO) कार्यालये, पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस चौक्यांमधून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे पास 6 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत पंढरपूरला जाताना आणि परतीच्या प्रवासातही वैध असतील. ही सुविधा हलकी तसेच जड वाहनांसाठी लागू राहणार आहे. वाहतूक, सुरक्षा आणि रस्ते दुरुस्तीवर विशेष भर वारीदरम्यान टोल नाक्यांवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Warkari) याशिवाय महामार्ग सुरक्षा पथक मार्फतही टोल नाक्यांजवळ अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषद यांच्या माध्यमातून अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिवहन विभागाला गरजेनुसार अतिरिक्त एसटी बस सोडण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख महामार्ग, राज्यमार्ग, जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, रस्त्यांची दुरुस्ती, दिशादर्शक फलक उभारणे आणि सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक 20 ते 25 किलोमीटर अंतरावर रुग्णवाहिका, क्रेन आणि रस्ते दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच ज्या एसटी बसेसना टोलमाफी लागू नाही, त्यांनाही संबंधित कूपन किंवा पासच्या माध्यमातून सवलत देण्यात येणार आहे. (Warkari) तसेच जिल्हा आणि शहरातील सर्व पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखांमधून भाविक, वारकरी आणि पालख्यांच्या वाहनांसाठी मागणीनुसार टोलमाफीचे पास वितरित केले जाणार असून, संबंधित उद्योजकांना राज्याच्या अर्थसंकल्पातून नुकसानभरपाई दिली जाणार आहे. टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, ट्रॅफिक वॉर्डन आणि हँडहेल्ड मशीनची व्यवस्था करण्याचे आदेशही सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
