आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर दुप्पट झाल्याने भारताचे ऑक्टोबर महिन्यातील निव्वळ तेल आणि नैसर्गिक वायू (गॅस) आयात बिल वार्षिक तुलनेत ६० टक्क्यांनी वाढून १६ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हेच बिल १० अब्ज डॉलर होते.
ब्रेंट कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति पिंप १२४.७७ डॉलरवर गेल्याने आयात खर्चात मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कच्च्या तेलाच्या आयातीचे प्रमाण तुलनेने कमी वाढले असतानाही त्यासाठी मोजावी लागणारी रक्कम दुप्पट झाली आहे. दुसरीकडे, देशभरात स्वयंपाकाच्या गॅसचा (एलपीजी) वापर घटला असून ग्राहकांची संख्याही कमी झाली आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. ऑक्टोबरमध्ये भारताने कच्च्या तेलाच्या आयातीसाठी १९.५ अब्ज डॉलर खर्च केले. या काळात कच्च्या तेलाच्या आयातीचे प्रमाण मात्र ११ टक्क्यांनी वाढून २३.३ दशलक्ष टन झाले. म्हणजेच, आयातीचे प्रमाण मर्यादित वाढले असले तरी जागतिक बाजारातील दरवाढीमुळे देशाच्या परकीय चलनावरील भार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाचा सरासरी दर प्रति पिंप १२४.७७ डॉलर होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये हाच दर ६४.७५ डॉलर होता. ब्रेंट तेलाच्या दराबरोबर भारतीय ‘तेल बास्केट’चा दरही ६५.०८ डॉलरवरून ११९.९१ डॉलरवर पोहोचला आहे.
डिझेलच्या वापरात वाढ
ऑक्टोबरमध्ये डिझेलचा वापर १२ टक्क्यांनी वाढून ८५ लाख टनांवर पोहोचला. पेट्रोलच्या वापरात ३.५ टक्क्यांची, तर रस्तेबांधणीसाठी वापरल्या जाणार्या बिटुमेनच्या वापरात १६.५ टक्क्यांची वाढ झाली. ऑक्टोबरमध्ये देशातील नैसर्गिक वायूचा वापर ७.२७ टक्क्यांनी घटून ५,७०७ दशलक्ष घनमीटरवर आला. एलएनजीच्या आयातीतही ६.९४ टक्क्यांची घट झाली. देशातील नैसर्गिक वायूच्या एकूण गरजेपैकी ५२.८ टक्के गरज आयातीद्वारे भागवावी लागली.
गॅसच्या वापरात घट का?
ऑक्टोबरमध्ये एलपीजीचा वापर १२.३ टक्क्यांनी, तर एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत १५.१ टक्क्यांनी कमी झाला. देशातील सक्रिय घरगुती एलपीजी ग्राहकांची संख्याही घटली आहे. एक एप्रिल रोजी ३३.४ कोटी असलेली ही संख्या एक नोव्हेंबर रोजी ३२.६ कोटींवर आली. खासगी कंपन्यांकडून थेट होणार्या एलपीजी आयातीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत ९७.३ टक्क्यांची घट झाली. मोठ्या प्रमाणात होणार्या एलपीजी विक्रीतही ४९.१ टक्क्यांची घसरण झाली. मात्र, वाहनांसाठी वापरल्या जाणार्या ऑटो एलपीजीच्या विक्रीत २३.९ टक्क्यांची वाढ झाली.
घरगुती एलपीजी ग्राहकांची संख्या
तारीख सक्रिय ग्राहक
१ एप्रिल २०२६ ३३.४ कोटी
१ नोव्हेंबर २०२६ ३२.६ कोटी
एलपीजी वापर– विक्रीघट
एलपीजीचा एकूण वापर १२.३% घट
* खासगी कंपन्यांची थेट एलपीजी आयात ८३.८% घट
* सरकारी कंपन्यांची घरगुती एलपीजी विक्री ११.८% घट
* पेट्रोलियम उत्पादनांची आयात ४१.२% घट
* ऑटो एलपीजी विक्री २३.९% वाढ
इंधन वापरातील बदल
डिझेल १२% वाढ
पेट्रोल ३.५% वाढ
इंधन / उत्पादन ऑक्टोबरमधील बदल
