Homeमहाराष्ट्रसोशल मीडियावर Like केल्यावर मिळणार पैशांचा पर्याय; एलन मस्कचा भन्नाट प्लॅन.

सोशल मीडियावर Like केल्यावर मिळणार पैशांचा पर्याय; एलन मस्कचा भन्नाट प्लॅन.

सोशल मीडियावर एखादी पोस्ट आवडली की, आपण लगेच Like बटण दाबतो. पण आता याच Like बटणाच्या मदतीने आवडत्या क्रिएटरला थेट पैसे पाठवता आले तर?

 

एलन मस्क यांच्या नव्या घोषणेमुळे अशी सुविधा X (पूर्वीचं ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Like बटण काही वेळ दाबून ठेवल्यास X Money च्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला 1 डॉलर पाठवता येईल, अशी माहिती मस्क यांनी पोस्टद्वारे दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कंटेंट पाहण्यासोबतच त्याला आर्थिक पाठबळ देण्याची पद्धतही बदलू शकते.

 

नेमकं काय आहे एलन मस्क यांचं नवं फीचर?

 

एलन मस्क यांनी 25 ऑक्टोबर रोजी X वर या संभाव्य फीचरबाबत पोस्ट केली आहे. त्यानुसार, युजरने एखाद्या पोस्टवरील Like बटण काही वेळ दाबून ठेवल्यास X Money च्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला 1 डॉलर पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सध्या एखाद्या क्रिएटरचं काम आवडलं, तर त्याला आर्थिक मदत करण्यासाठी स्वतंत्र पेमेंट अ‍ॅप किंवा दुसऱ्या प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागतो. मात्र, हे फीचर प्रत्यक्षात सुरू झाल्यास X च्या माध्यमातूनच पैसे पाठवणं शक्य होईल. अर्थात, ही सुविधा नेमकी कशी काम करेल, याबाबत कंपनीकडून अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

 

क्रिएटर्सना थेट आर्थिक मदत मिळणार?

 

मस्क यांच्या या फीचरचा सर्वाधिक फायदा कंटेंट क्रिएटर्सना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण एखाद्या युजरला व्हिडीओ, पोस्ट, माहिती किंवा अन्य कंटेंट आवडला, तर केवळ Like करण्याऐवजी तो क्रिएटरला थेट आर्थिक मदतही करू शकतील. युजर्सना केवळ 1 डॉलरच पाठवता येणार की, स्वतःच्या पसंतीनुसार रक्कम निवडता येईल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

 

X ला ‘Everything App’ बनवण्याच्या दिशेने वाटचाल

 

एलन मस्क यांची X बाबतची कल्पना केवळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपुरती मर्यादित नाही. चॅटिंग, कंटेंट शेअरिंग, व्हिडीओ, आर्थिक व्यवहार आणि इतर डिजिटल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. X Money सारख्या सेवांमुळे ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. यामुळे भविष्यात X हे केवळ पोस्ट पाहण्याचं किंवा मित्रांशी संवाद साधण्याचं माध्यम न राहता, डिजिटल व्यवहारांसाठीही वापरलं जाणारं अ‍ॅप बनू शकतं. मात्र, त्यासाठी पेमेंट सेवा, सुरक्षितता, नियमांचं पालन आणि विविध देशांमधील आर्थिक परवानग्या या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

 

भारतात कधी येणार फीचर?

 

भारतीय युजर्ससाठी या सुविधेबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. X Money सेवा भारतात कधी सुरू होणार आणि Like बटणाद्वारे पैसे पाठवण्याचं फीचर भारतीय युजर्सना मिळणार का, याबाबतही स्पष्टता नाही. पण, एकूणच एक्सवरील Like बटणाचं काम आता केवळ पोस्ट आवडल्याचं सांगण्यापुरतं राहणार नाही, तर त्यातून क्रिएटरला आर्थिक मदत करण्याची संधीही मिळू शकते. मात्र, ही संकल्पना प्रत्यक्षात कधी येते आणि तिचा वापर कोणत्या देशांत करता येतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -