इचलकरंजी : हातकणंगले रेल्वे स्थानकावरील रिक्षाचालकांनी ई-बस सेवा अडवून धरल्याने निर्माण झालेला पेच परिवहन सभापती अरुणा बचाटे यांनी खासगी वाहनाने घटनास्थळी पोहोचून सोडविला. ई-बस सेवेमुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याच्या तक्रारीनंतर सातपैकी दोन बस फेऱ्या कमी करण्याच्या तोडग्यावर आंदोलन मागे घेण्यात आले आणि सेवा पूर्ववत सुरू झाली.मात्र, आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतरही महापालिका प्रशासनाने सभापतींना वाहन उपलब्ध करून न दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हातकणंगले रेल्वे स्थानकावर सकाळी साडेसहा वाजता येणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि साडेदहा वाजता येणाऱ्या कलबुर्गी एक्स्प्रेसमधून उतरलेल्या प्रवाशांमुळे रिक्षाचालकांना व्यवसाय मिळत होता. या दोन रेल्वे गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या वाहतुकीतून सुमारे २५ ते ३० रिक्षाचालकांना रोजगार उपलब्ध होत होता. मात्र, इचलकरंजी महानगरपालिकेची ई-बस सेवा सुरू झाल्यापासून प्रवासी बसने प्रवास करण्यास प्राधान्य देत असल्याने रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला. परिणामी, पूर्वी २५ ते ३० रिक्षाचालकांना मिळणारा व्यवसाय आता अवघ्या दोन ते तीन रिक्षाचालकांपुरता मर्यादित राहिल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.
या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनी रेल्वे स्थानकावर ई-बस अडवून आंदोलन सुरू केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक महेश पाटील यांनी रिक्षाचालकांच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिकेच्या परिवहन सभापती अरुणा बचाटे यांच्यासमोर त्यांच्या व्यथा मांडल्या. चर्चेनंतर दिवसातील सात बस फेऱ्यांपैकी दोन फेऱ्या कमी करण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि ई-बस सेवा पूर्ववत सुरू झाली.
चौकट
परिवहन सभापतींना महापालिकेकडून वाहन नाकारले?
हातकणंगले रेल्वे स्थानकावर रिक्षाचालकांनी ई-बस सुमारे दोन तास अडवून धरल्याची माहिती परिवहन सभापती अरुणा बचाटे यांना मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने घटनास्थळी जाण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे वाहनाची मागणी केली. मात्र, प्रशासनाकडून त्यांना वाहन उपलब्ध करून देण्यात आले नाही.आंदोलनस्थळी तातडीने पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणणे आवश्यक असतानाही वाहन उपलब्ध न झाल्याने बससेवा सुमारे दोन ते तीन तास खोळंबली. संतप्त आंदोलकांकडून नव्या ई-बसची तोडफोड होण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. अशा परिस्थितीत सभापती बचाटे यांनी अखेर खासगी वाहनाची व्यवस्था करून हातकणंगले गाठले. तेथे रिक्षाचालकांशी चर्चा करून त्यांनी वादावर तोडगा काढला आणि ई-बस सेवा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला.



