इचलकरंजी : शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना गंगानगर रोडवर विनानंबर प्लेटची हिरो स्प्लेंडर दुचाकी आढळून आली. याप्रकरणी लहु बोजा जावीर (वय ४०, रा. उदगाव, जयसिंगपूर) याला ताब्यात घेऊन शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक शाखेचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश कोरवी व पोलीस अंमलदार निलेश डोंगरे हे गंगानगर रोडवर नियमित गस्त घालत असताना ही दुचाकी आढळली. दुचाकीच्या पुढील व मागील बाजूस नंबर प्लेट नव्हती, तसेच चेसिस व इंजिन क्रमांकही दिसून येत नव्हते. वाहनाच्या मालकीबाबत विचारणा केली असता संबंधिताने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
पोलिसांनी दुचाकीसह संबंधिताला ताब्यात घेतले असून, पुढील तपास शहापूर पोलिस करीत आहेत. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



