Homeमहाराष्ट्र1 नोव्हेंबरपासून टोल शुल्कात होणार मोठी बचत! वार्षिक पास फक्त 1,500 रुपयांत;...

1 नोव्हेंबरपासून टोल शुल्कात होणार मोठी बचत! वार्षिक पास फक्त 1,500 रुपयांत; कोणाला होणार फायदा?

टोल नाक्यांच्या जवळ राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांसाठी आणि खाजगी वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. दररोज टोल भरण्याच्या आर्थिक भुर्दंडापासून आता स्थानिकांना कायमची मुक्ती मिळणार आहे.

 

 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008’ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. या नव्या नियमांनुसार, टोल प्लाझाच्या 20 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या पात्र खाजगी वाहनधारकांना आता अगदी सवलतीच्या दरात वार्षिक लोकल पास काढता येणार आहे. हा नवा नियम 1 नोव्हेंबर 2026 पासून देशभरात लागू होणार आहे.

 

केंद्र सरकारने या विशेष पाससाठी ठराविक वार्षिक फी निश्चित केली आहे. मात्र, या योजनेचा प्रत्यक्ष फायदा मिळवण्यासाठी काही विशिष्ट अटी व शर्तींची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे.

 

 

1,500 ते 3,000 रुपयांपर्यंत असणार वार्षिक फी

 

सुधारित नियमांनुसार, टोल नाक्यापासून 20 किलोमीटरच्या परिघात राहणारे गैर-व्यावसायिक (Non-commercial) म्हणजेच खाजगी गाडी मालक या सवलतीच्या पाससाठी अर्ज करू शकतील. पासचा नेमका दर टोल प्लाझा कुठे स्थित आहे, यावर अवलंबून असेल.

 

1,500 रुपये वार्षिक फी: जर संबंधित टोल प्लाझा एखाद्या नगरपालिका किंवा स्थानिक नागरी क्षेत्राच्या सीमेबाहेर स्थित असेल, तर तेथील स्थानिकांना वार्षिक पाससाठी 1,500 रुपये मोजावे लागतील.

 

3,000 रुपये वार्षिक फी: जर टोल प्लाझा नगरपालिका किंवा स्थानिक नागरी सीमेच्या आत असेल, तर तेथील स्थानिकांसाठी वार्षिक पासची फी 3,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

 

हा पास संबंधित टोल नाक्यावरून ये-जा करण्यासाठीच वैध असेल. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना सतत टोल भरण्याऐवजी वर्षातून एकदाच ठराविक रक्कम भरून प्रवास करण्याचा सोपा पर्याय उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ सर्वच वाहनधारकांना सरसकट मिळणार नाही. त्यासाठी काही अटी लागू असतील.

 

 

कोणाला मिळणार नाही या योजनेचा फायदा?

 

ही सुविधा केवळ खाजगी वापरासाठी असलेल्या वाहनांसाठीच असेल.

वाहनावर वैध आणि चालू स्थितीतील फास्टॅग (FASTag) असणे अनिवार्य आहे.

पर्यायी रस्ता उपलब्ध असल्यास पास नाही: जर प्रवासासाठी सर्व्हिस रोड किंवा इतर कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध असेल, तर अशा ठिकाणच्या रहिवाशांना हा सवलतीचा पास जारी केला जाणार नाही.

 

अंतरानुसार टोल असलेल्या महामार्गांवर अट: ज्या राष्ट्रीय महामार्गांवर किंवा एक्स्प्रेस-वे वर (Expressway) प्रत्यक्ष कापलेल्या अंतराच्या आधारे टोल आकारला जातो, तिथेही हा पास चालणार नाही.

 

दरवर्षी 1 एप्रिलला होणार दरांमध्ये सुधारणा

 

शासकीय अधिसूचनेनुसार, या वार्षिक पासच्या निश्चित करण्यात आलेल्या दरांमध्ये सरकार दरवर्षी 1 एप्रिल रोजी सुधारणा करू शकते. म्हणजेच, भविष्यात या पासच्या शुल्कात आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतात. एकंदरीत, टोल नाक्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या पात्र खाजगी गाडी मालकांना या नियमामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. तरीही, पास काढण्यापूर्वी आपल्या वाहनाची पात्रता आणि संबंधित टोल नाक्यावर लागू असलेल्या अटींची नीट माहिती घेणे गरजेचे ठरेल

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -