येथील शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर दरवर्षी दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर बाजार भरतो, यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने न्यायालयातील याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय मंगळवारी महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. तसेच दिवाळीत शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर कोणत्याही परिस्थितीत बाजार भरवण्यास परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका प्रशासन आणि शहरातील तिन्ही पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची संयुक्त बैठक झाली. यावेळी न्यायालयीन आदेश, शहरातील वाहतुक व्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता तसेच सार्वजनिक रस्त्यांवरील
अतिक्रमण आणि अनधिकृत स्टॉल्स यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे संबंधितांना बंधनकारक असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत आयुक्त पाटील यांनी संबंधित विभागांना न्यायालयीन आदेशाची प्रभावी
अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, अशोक कुंभार, राहुल मईकर, विद्या कदम, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, सहा. संचालक नगररचना विजय फुलपगारे, शहर अभियंता मधुकर बंडगर, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, महेश चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक विकास शिंदे, राज्य परिवहन महामंडळाच्या शिल्पा थोरात, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे, अधिशमन अधिकारी प्रणव कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
