देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गुरुवार(१९ नोव्हेंबर २०२६) रोजी बँकेच्या UPI सेवा सुमारे ४५ मिनिटांसाठी बंद राहणार आहेत.
बँकेने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. नियोजित देखभाल कामामुळे ही सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजून १५ मिनिटांपासून ते २ वाजेपर्यंत SBI च्या UPI सेवांचा वापर करता येणार नाही. त्यामुळे या कालावधीत UPI द्वारे पैसे पाठवणे किंवा पेमेंट करणे शक्य होणार नाही.
SBI ने सोशल मीडियावरून दिली माहिती
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत X अकाउंटवर पोस्ट शेअर करून ग्राहकांना या नियोजित देखभाल कामाची माहिती दिली आहे. बँकेच्या पोस्टनुसार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.१५ ते २ वाजेपर्यंत SBI च्या UPI सेवा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध नसतील. मात्र, देखभालीचे काम निर्धारित वेळेआधी पूर्ण होण्याची शक्यताही बँकेने व्यक्त केली आहे.
या कालावधीत ग्राहकांना अखंडित सेवा मिळावी यासाठी UPI Lite चा वापर सुरू ठेवता येईल, असेही बँकेने स्पष्ट केले आहे. ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल बँकेने दिलगिरी व्यक्त केली आहे.
UPI Lite सेवा सुरू राहणार
बँकेच्या या घोषणेनंतर ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे UPI Lite सेवा या कालावधीत सुरू राहणार आहे. UPI Lite ही कमी रकमेच्या व्यवहारांसाठी तयार करण्यात आलेली पेमेंट सुविधा आहे.
या सुविधेअंतर्गत ग्राहक आपल्या बँक खात्यातून पैसे UPI Lite वॉलेटमध्ये जमा करू शकतात. त्यानंतर वॉलेटमधील उपलब्ध शिल्लक रकमेतून प्रत्येक व्यवहारासाठी UPI PIN टाकण्याची गरज न पडता पेमेंट करता येते. मात्र, यासाठी संबंधित UPI अॅपमध्ये UPI Lite ची सुविधा उपलब्ध आणि सक्रिय असणे आवश्यक आहे.
UPI Lite व्यवहाराची मर्यादा किती?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, UPI Lite द्वारे एका व्यवहारासाठी कमाल १,००० रुपयांची मर्यादा आहे. तसेच UPI Lite वॉलेटमध्ये एकावेळी जास्तीत जास्त ५,००० रुपये ठेवता येतात. डिसेंबर २०२४ मध्ये RBI ने या मर्यादांमध्ये वाढ केली होती. त्यापूर्वी एका व्यवहाराची मर्यादा ५०० रुपये, तर वॉलेटमधील कमाल शिल्लक मर्यादा २,००० रुपये होती.
