हिंदू पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा करण्याची महाराष्ट्रात विशेष परंपरा आहे.
घरात सुख, समृद्धी, शांती आणि भरभराट नांदावी, या इच्छेने अनेक महिला मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत श्रद्धेने करतात. यंदा मार्गशीर्ष महिना कधी सुरू होत आहे? महालक्ष्मी व्रताचा पहिला आणि शेवटचा गुरुवार कोणत्या तारखेला आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया…
मार्गशीर्ष महिना कधी सुरू होणार?
मराठी पंचांगानुसार, यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ९ डिसेंबर २०२६, बुधवार रोजी होणार आहे. या महिन्यात महालक्ष्मी व्रतासाठी एकूण पाच गुरुवार येणार आहेत. पहिला गुरुवार १० डिसेंबरपासून सुरू होणार असून, शेवटचा गुरुवार ७ जानेवारी २०२७ रोजी असेल.
पहिला गुरुवार : १० डिसेंबर २०२६
दुसरा गुरुवार : १७ डिसेंबर २०२६
तिसरा गुरुवार : २४ डिसेंबर २०२६
चौथा गुरुवार : ३१ डिसेंबर २०२६
पाचवा आणि शेवटचा गुरुवार : ७ जानेवारी २०२७
मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचे महत्त्व काय?
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा देवी महालक्ष्मीच्या उपासनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, देवी महालक्ष्मी ही धन, धान्य, ऐश्वर्य, सौभाग्य आणि सुख-समृद्धीची देवता आहे. या महिन्यात गुरुवारी देवीची मनोभावे पूजा केल्याने घरात सुख-शांती नांदते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि कुटुंबावर देवीची कृपा राहते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत अनेक महिला कुटुंबाच्या कल्याणासाठी, सुखी संसारासाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी करतात. काही महिला उपवास करतात, तर काही एकभुक्त राहून देवीची आराधना करतात.
महालक्ष्मी गुरुवारची पूजा कशी केली जाते?
मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केली जाते. देवघरात किंवा घरातील स्वच्छ जागी चौरंग मांडून त्यावर वस्त्र अंथरले जाते. त्यानंतर कलश स्थापना करून कलशाला देवी महालक्ष्मीचे प्रतीक मानून पूजा केली जाते. कलशावर नारळ, पाने, वस्त्र आणि अलंकारांनी सजावट केली जाते.
पूजेदरम्यान देवीला फुले, हळद-कुंकू, अक्षता, नैवेद्य अर्पण केला जातो. महालक्ष्मी व्रताची कथा वाचली जाते आणि शेवटी देवीची आरती केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी घरच्या परंपरेनुसार उद्यापन केले जाते. काही ठिकाणी सुवासिनी महिलांना हळद-कुंकू देऊन प्रसाद वाटण्याची प्रथा आहे.
