Friday, November 22, 2024
HomeनोकरीMPSC परीक्षेला जाण्याअगोदर तयारी कशी करावी?

MPSC परीक्षेला जाण्याअगोदर तयारी कशी करावी?

ताजी बातमी ऑनलाइन टीम

It’s better to have extra time on your hand”. असाच काहीसा प्रकार घडलाय राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 उमेदवारांच्या बाबतीत. 2 जानेवारी 2022 ऐवजी 23 जानेवारी 2022 ला होणार्‍या या परीक्षेसाठी उमेदवारांनी शेवटच्या काही दिवसांचे योग्य नियोजन करणे अगदी महत्त्वाचे ठरते.

स्पर्धा (MPSC) परीक्षेमधील प्रत्येक टप्पा हा उमेदवारामध्ये असणारी वेगवेगळी गुणकौशल्ये तपासतो. प्रत्येक टप्प्याची मागणी वेगळी असून त्यानुसार उमेदवाराने स्वतःच्या तयारीत बदल करावेत. पूर्व परीक्षेमध्ये पेपर क्र. 1 हा संपूर्णतः सामान्य अध्ययनाचा असल्याने यामध्ये विषयांतील संकल्पनांचे ज्ञान असावे. प्रश्न सोडविताना वेळेच्या नियोजनास भर देणे ही परीक्षेची मागणी नसते. मात्र पेपर क्र. 2 ज्यास ’उडअढ’ असे म्हणतात, यामध्ये वेळेचे व्यवस्थापन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. किंबहुना, उमेदवाराकडे याचे कौशल्य आहे का नाही हेच परीक्षेमध्ये तपासले जाते. त्यामुळे शेवटच्या दिवसांत कोणत्याही पेपरकडे दुर्लक्ष करता कामा नये.

शेवटच्या दिवसांत उमेदवारांनी जास्तीत जास्त उजळणीवर लक्ष केंद्रित करावे; अन्यथा वर्षभर केलेली मेहनत उपयोगात येणार नाही. नवीन संकल्पना वा पुस्तकांचे वाचन टाळलेलेच बरे म्हणजे अभ्यासातील आत्मविश्वास वाढतो व संभ्रमावस्था टाळता येते. बाजारात नव्याने आलेल्या रंगीबेरंगी पुस्तकांच्या मोहात न पडलेलेच बरे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास विस्तारित स्वरूपाचा असल्याने परीक्षेत कोणताही मुद्दा अचानकपणे आठविण्यासाठी उजळणीला पर्याय नाही.

वर्षभराच्या मेहनतीला तेव्हाच फळ येणार जेव्हा परीक्षा (MPSC) हॉलमध्ये उमेदवार योग्य परफॉर्म करतो. यामध्ये उमेदवाराचा आत्मविश्वास, मानसिकता, स्थिरता या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. परीक्षेचा अभ्यास व परीक्षा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या उमेदवाराचा अभ्यास परिपूर्ण असला तरी ऐनवेळी परीक्षेत तो गोंधळू शकतो. यासाठी उपयोगी ठरते ती परीक्षेची रंगीत तालीम म्हणजेच आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांच्या काठिण्य पातळीनुसार केलेला सराव.

परीक्षेचा दिवस हा कोणत्याही उमेदवारासाठी महत्त्वाचा असतो. तो दिवस आपल्या इच्छेनुसार होण्यासाठी अगोदरचे काही दिवस आपल्या आहारावर व शरीरावर लक्ष देणे गरजेचे. जास्त अभ्यासाच्या हव्यासापोटी बरेचजण या दिवसांत रात्रीचे जागणे करतात. आहाराकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे योग्यवेळी झोप, योग्य व हलका आहार असणे गरजेचे असते.

अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उमेदवाराची मानसिकता व स्वतःचा आत्मविश्वास होय. काही उमेदवारांचा अभ्यास, सराव व इतर सर्व बाबी योग्य असून देखील त्यांना अपेक्षित यश मिळत नाही, त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची मानसिकता व आत्मविश्वास. तसेच सध्या सुरू असणार्‍या महामारीमुळेदेखील आपल्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवावेत व आत्मविश्वास वाढेल अशा गोष्टी करण्यावर भर द्यावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -