भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करीत सोमय्या यांच्या नेतृत्वात भाजप खासदारांच्या शिष्टमंडळाने गुरूवारी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. शिवसैनिकांकडून सोमय्यांकडे दगड भिरकावली जात असताना पुणे पोलिसांनी काहीच केले नाही. उलटपक्षी पोलिसांनी त्यांची मदतच केली, असा थेट आरोप भेटीदरम्यान सोमय्या आणि शिष्टमंडळाने केला. शिष्टमंडळात भाजप खासदार गोपाळ शेट्टी, गिरीश बापट, रक्षा खडसे, मनोज कोटक यांचा समावेश होता.
उद्धव ठाकरे सरकारने संजय राऊत यांच्या कंपनीला बेनामी कंत्राटे दिली. १०० कोटी रुपयांचे घोटाळे झाले. हे घोटाळे उघडकीस आणल्याने शिवसेनेच्या १०० गुंडांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिस, पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून सेनेच्या गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. त्याची व्हिडिओ क्लीप गृहसचिवांकडे सादर केली असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनीपुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यामुळे हे घडले आहे. शिवसैनिक दगड भिरकावत असताना पोलीस काहीच करीत नव्हते, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच कोरोना सेंटर घोटाळ्याचीही चौकशी करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. सदर दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन गृहसचिवांनी दिल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.