विवाहित महिला राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळल्याने एकच खळबळ उडाली. घराच्या दरवाजाला बाहेरुन कुलूप असल्यामुळे हत्येचं गूढ आणखी वाढलं होतं. जळगाव जिल्ह्यातील सप्तश्रृंगीनगर परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेचा मुलगा ऑफिसहून घरी आला, तेव्हा त्याला आपली आई मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक तपास केला असता पतीनेच विवाहितेची हत्या केल्याचं समोर आलं. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. डोक्यात लाकडी पाटीने वार करुन पत्नीची हत्या केल्याची कबुली पतीने दिली आहे. सुनिता संजय महाजन असं 46 वर्षीय मयत महिलेचं नाव आहे.
पब्जीच्या नादात तलवारीने केला खराखुरा हल्ला; 22 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू
गुरुवारी दुपारच्या सुमारास सुनिता महाजन या आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या. सुनिता यांचा मुलगा दुपारी कामावरुन घरी आला तेव्हा घराचा दरवाजा बाहेरुन बंद होता. दरवाजाचे कुलूप उघडून सुनिता यांच्या मुलाने घरात प्रवेश केला तेव्हा, घरात सुनिता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या.
मुलाने आरडाओरड केल्यावर शेजाऱ्यांची गर्दी जमा झाली. डॉक्टरांनी सुनिता महाजन यांना तपासले असता त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला.
महिलेची हत्या करुन घराला बाहेरुन कुलूप लावून पळणारा व्यक्ती हा महिलेच्या परिचयाचा असावा असा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी आपला तपास केला. त्यानंतर अवघ्या काही तासांतच आरोपीचा तपास लागला.
पोलिसांनी मृत महिलेच्या पतीची माहिती काढून त्याची विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली. पतीनेच हत्या केल्याचं तपासात उघड झालं. चारित्र्याच्या संशयातून पत्नीची डोक्यात लाकडी पाटीने वार करुन हत्या केल्याची कबुली आरोपी पती संजय महाजन याने दिली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.