बुधवारी सायंकाळी तालुक्याच्या पूर्व परिसराला जोरदार चक्रीवादळाचा दणका बसला. यामध्ये प्रामुख्याने रायपाटण, पाचलमध्ये जोरदार पडझड झाली. अनेकांच्या घरांवर झाडे उन्मळून पडली. घराची कौले पत्रे उडाले. या वादाळामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुधवारी रात्रीपासून या ठिकाणची वीज गायब झाली होती.
बुधवारी सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वाऱ्याने वेग धारण केला. काही वेळात याचे जोरदार चक्रीवादळात रुपांतर झाले. वारा तुफान वेगाने वाहू लागला. या समवेत पावसालाही सुरवात झाली.
अचानक सुरु झालेल्या वादळाने जोरदार वेग घेत या गावांना जोदार तडाखा दिला. यामध्ये रायपाटणमधील बागवाडी, खाडेवाडी, कदमवाडी, सनगरवाडी, बाजारवाडी आदी वाड्यांसह पाचल मधील काही वाड्या आणि परीसरातील अनेक गावांना या वादळाचा जोरदार फटका बसला. तुफान वादळात अनेकांच्या घरावर मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यामध्ये घरांचे आतोनात नुकसान झाले. वादळात घरांवरील कौले – पत्रे उडाली.
घरातील माणसे वादळाच्या भयाने बाहेर पळाली. रायपाटण होळीचा मांडावरील उभारलेली होळी एका बाजुला थोडीशी कलंडली होती नंतर ती ग्रामस्थांनी व्यवस्थीत केली. तर पाचल मधील होळीच्या मांडावर देखील पडझड झाल्याची घटना घडली. रायपाटण ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात एक वृक्ष उन्मळून पडला तर गावातील गवाडी, खाडेवाडी, कदमवाडी मध्ये विद्युत वाहीन्यांवर झाडे पडल्याने गावासह लगतच्या परीसरातील विद्युत पुरवठा प्रदीर्घकाळ खंडीत झाला होता.
गुरुवारी दुपारपर्यंत तो सुरळीत झाला नव्हता, परीसरातील मोबाईल सेवाही खंडीत झाली होती. रायपाटण मधील श्रीरेवणसिध्द मठामध्ये देखील वादळात पडझड झाल्याची घटना घडली. निसर्गाच्या रौद्र रुपात अनेक ठिकाणी मोठा फटका बसला होता. ठिकठिकाणी उन्मळून पडलेली झाडे दिसुन येत होती. तर सध्या होळीचा सण सुरु असुन वादळी पावसामुळे ठिकठिकाणच्या होळीच्या मांडान्ना त्याची झळ पोहचल्याने मांडावरील विराजमान देवतांच्या पालख्या आजुबाजुच्या घरामध्ये बसव्या लागल्या.
अगंतुक वादळी पावसाचा जोरदार तडाखा आंबा, काजु पिकांना बसला. अनेक ठिकाणी आंबा काजुच्या बागा उद्धवस्त झाल्या. कलमे वाकली. मोडुन पडली बागांचे नुकसान झाले. या वादळी वाऱ्याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका या बागांना बसला. यामध्ये नक्की किती प्रमाणात नुकसान झाले ते आता त्या सर्वांचा पंचनामा झाल्यानंतरच समजु शकणार आहे. गेल्या काही वर्षात वादळी पावसाचा असा फटका परीसराला बसला नव्हता. निसर्गाच्या या अकांडतांडवात सुदैंवाने जीवित हानी टळली होती.