एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ३१ मार्च पर्यंत कामावर हजर व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधिमंडळात बोलताना केले होते. आता दीर्घकाळ लांबलेल्या एसटी संपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. ३१ मार्चपर्यंत जे कोणी कामावर येणार नाहीत त्यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली जाईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास वेतनवाढ दिली आहे. यामुळे आता एसटीचा प्रश्न संपला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
एसटीचा प्रश्न आता सुटलेला आहे. याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल सदनात माहिती दिलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची संधी देण्यात आली आहे. त्यांना पगारवाढ केली आहे. पगार वेळेत होणार, याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. १० तारखेपर्यंत पगार होईल. पण ३१ मार्च पर्यंत जर कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही, तर जे कामावर येणार नाहीत. त्याच्यावर कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.
कोणाचीही नोकरी जाणार नाही. कर्मचारी कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत चर्चा करण्याची ग्वाही अनिल परब यांनी याआधी दिली आहे. आता अजित पवार यांनी लांबलेल्या एसटी संपावरून नाराजी व्यक्त केली आहे.
दिवाळीत सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघाला नाही. मागच्या तीन महिन्यांपासून सरकार आणि एसटी संपकरी याच्यांत कित्येक चर्चा पार पडल्या पण यातून संपकऱ्यांच्या काही मागण्या मान्य न झाल्याने संपकरी अजुनही आपल्या भुमिकेवर ठाम आहेत.