ताजी बातमी ऑनलाइन टीम
अभिनेत्री सोनम कपूरचा पती आनंद अहुजाच्या (Anand Ahuja) घरातून जवळपास अडीच कोटी रुपयांची चोरी झाली होती. अपर्णा रुथ विल्सन आणि तिचा पती नरेश कुमार सागर या दोघांनी 11 महिन्यांत 2.45 कोटी रुपयांचे दागिने आणि पैसे चोरले. चोरलेल्या पैशांचं या दोघांनी काय केलं, त्याविषयीची माहिती आता समोर आली आहे. अपर्णा आणि नरेशने चोरलेले दागिने देव वर्मा या सोनाऱ्याकडे विकले आणि त्यातून मिळालेल्या पैशांनी त्यांनी कर्ज फेडलं, आईवडिलांच्या उपचारासाठी खर्च केले आणि सेकंड हँडi-10 कार विकत घेतली. चोरीच्या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्यांनी याबद्दलची कबुली दिली.
चोरी केलेल्या वस्तू
तीन संशयितांना पकडणाऱ्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी या तिघांच्या ताब्यातून 1.25 कोटी रुपयांचे दागिने आणि हिरे जप्त केले आहेत. दागिने आणि रोख रक्कम चोरण्याचा कट रचणाऱ्या विल्सन आणि सागर यांना बुधवारी अटक केल्याची माहिती विशेष पोलिस आयुक्त (गुन्हे) रवींद्र यादव यांनी दिली. “आम्ही चोरीच्या वस्तू खरेदी करणारा सोनार देव वर्मा यालाही अटक केली आहे आणि त्याच्या ताब्यातून चोरीचे दागिने जप्त केले आहेत. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये 100 हिरे, सहा सोन्याच्या चेन, सहा हिऱ्यांच्या बांगड्या, एक हिऱ्याचे ब्रेसलेट, दोन टॉप्स, एक पितळी नाणं आणि एक हुंडाई आय-10 कारचा समावेश आहे. जप्त केलेल्या वस्तूंची अंदाजे किंमत ही 1.32 कोटी रुपये इतकी आहे”, असं पोलिसांनी सांगितलं.