राज्यात सध्या मशिदींवरी भोंग्यांवरुन राजकारण तापलेले असताना नाशिक पोलिस आयुक्तांनी महत्वाचे आदेश जारी केले आहेत. नाशिक शहरातील सर्व प्रकारचे भोंगे आणि ध्वनिक्षेपके उतरविण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. नाशिकमधील सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार असून विनापरवानगी कोणत्याही धार्मिक अथवा अन्य ठिकाणी लाऊड स्पीकर लावता येणार नसल्याचे पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तीन मे पर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरविल्यास लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा पठण करण्याचे आवाहन हिंदु बांधवांना राज ठाकरे यांनी केले आहे. अशात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी हे आदेश दिले असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. भोंग्यांबाबत अशा स्वरुपाचे आदेश देणारे नाशिक हे पहिलेच शहर ठरले आहे.